Lok Sabha 2024 : मनसे-भाजप युती फिक्स? राज ठाकरेंच्या शिलेदारानं सांगितली ‘खास बात’

Lok Sabha 2024 : मनसे-भाजप युती फिक्स? राज ठाकरेंच्या शिलेदारानं सांगितली ‘खास बात’

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होणार असून मनसे-भाजप युती आकार घेऊ लागली आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे नेत्यांची हजेरी.. या सगळ्या गोष्टी भविष्यातील युतीचेच संकेत देत आहेत. आता तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वक्तव्याने मनसे-भाजप युतीच्या चर्चांना ‘टॉनिक’च मिळालं आहे.

बाळा नांदगावकरांनी टायमिंगही खास साधलं. भाजप आमदार प्रविण दरेकरांनी बाळा नांदगावकर यांना फोन करून मुंबईतील अभ्यूदर नगर येथील परिषदेला उपस्थित राहण्याची विनंती केली. देवेंद्र फडणवीसांनीच हा मेसेज द्यायला सांगितलं असंही सांगितलं. त्यानंतर राज ठाकरेंच्या संमतीनं बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई या दोन मनसे नेत्यांनी परिषदेला हजेरी लावली. यावेळी नांदगावकर यांनी जे वक्तव्य केलं त्यातून मनसे-भाजप युती होईल अशी दाट शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे.

“शरद पवार म्हणतील तसं…” : रोहित पवारांपाठोपाठ आणखी एक पुतण्या अजितदादांविरोधात मैदानात

नेमकं काय म्हणाले नांदगावकर ?

मला प्रविण दरेकर यांचा फोन आला होता. अभ्यूदय नगरमध्ये मुंबईतील काही समस्यांसंबंधी परिषद आहे. देवेंद्रजी स्वतः येणार आहेत. त्यांनीही तसा निरोप दिला आहे की बाळा भाऊंना बोलवा. त्यामुळे तुम्ही आलात तर बरं होईल असं दरेकर म्हणाले. यानंतर मी माझ्या पक्षप्रमुखांना विचारलं. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मी आणि नितीन सरदेसाई दोघेही येथे आलो आहोत. मुंबईतील समस्यांसंदर्भात ही एक मोठी परिषद होती. या परिषदेला उपस्थित राहणं गरजेचं होतं जेणेकरून समस्या मार्गी लागू शकतील.

देवेंद्र फडणवीस यांनी तुमचा उल्लेख सहकारी म्हणून केला आहे. आगामी काळात युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. युती करायची किंवा नाही करायची हा निर्णय पक्षप्रमुख घेतील. हा माझा विषय नाही. पण दोन राजकीय पक्षांचे नेते भेटल्यानंतर चर्चा होते, विचारविनिमय होतो. मी आधीच म्हणालो होतो की राजकारणात काहीच अशक्य नाही. भविष्यात काय होईल हे फडणवीसच बोलले आहेत त्यामुळे लवकरच काय ते कळेल.

सख्खा भाऊ पक्का वैरी! सुनील तटकरेंचं वर्चस्व मोडित काढण्यासाठी अनिल तटकरे शरद पवारांसोबत

युती झाली तर काही अडचण वाटण्याचं कारण नाही. होऊ शकते. निवडणुका जवळ आल्या की अशा चर्चा होतच असतात. आज आम्ही निदान मुंबईच्या समस्यांसाठी तरी एकत्र आलेलो आहोत. भविष्यात काय होणार हे दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख ठरवतील. पण त्यात माझा वाटाही असू शकतो. आम्ही नेहमीच भेटत असतो, बोलत असतो. भविष्यात काय होईल हे मी आताच सांगू शकत नाही पण अडचण असण्याचंही काही कारण नाही, अशा सूचक शब्दांत बाळा नांदगावकर यांनी भाजप-मनसे युतीचे संकेत दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज