नाना पटोलेंच्या वाहनाला ट्रकची धडक; अपघात नव्हे, चिरडण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या दाव्याने खळबळ!

नाना पटोलेंच्या वाहनाला ट्रकची धडक; अपघात नव्हे, चिरडण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या दाव्याने खळबळ!

Nana Patole Accident : काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत (Nana Patole) मोठी बातमी समोर येत आहे. नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नाना पटोले निवडणुकीच्या प्रचारातून परतत असताना त्यांच्या कारला भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागील बाजूने जोरात धडक दिली. सुदैवाने या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. भंडारा शहराजवळ असणाऱ्या भीलवाडा गावानजीक ही घटना घडली. या अपघातात पटोले यांच्या वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद किती महत्वाचे असते? नाना पटोले अन् काँग्रेसला ‘हिमाचल प्रदेश’ने दिले उत्तर

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारावरून रात्रीच्या सुमारास परतत असताना भीलवाडा गावजवळ हा अपघात झाला. पाठीमागील बाजून एक ट्रक येत होता. या ट्रकने पटोले यांच्या कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या एका बाजूचा चुराडा झाला. या अपघातात नाना पटोले किंवा इतर कुणाला काही इजा झाली नाही. सर्वजण सुरक्षित आहेत.

पटोलेंच्या वाहनाचा अपघात की घातपात : लोंढे

दरम्यान, या घटनेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. या अपघातावरून काँग्रेस नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. नाना पटोलेंच्या वाहनाचा अपघात ही गंभीर घटना आहे. त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का, अशी शंका लोंढे यांनी उपस्थित केली.

यासंदर्भात लोंढे यांनी ट्विट केले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादान नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत, असे लोंढे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube