आता कळलं मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? बच्चू कडूंचं अजितदादांना टोचणारं उत्तर
Bachchu Kadu on Cabinet Expansion : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला याची उत्तरे देण्यासाठी आमदारांच्या अपात्रतेचा निकालाचा मुद्दा पुढे केला जात होता. मात्र, ते कारण नव्हतेच. राष्ट्रवादी काँग्रेससाठीच हा विस्तार रखडला होता हे आता उमगल्याचं आमदार बच्चू कडूंनी सांगितलं.
कडू म्हणाले, न्यायालयाचा निकाल, अध्यक्षांचा निकाल यांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असेच सुरुवातीला वाटत होते. पण, आता समजलं राष्ट्रवादीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. आता फक्त काँग्रेस पक्ष बाकी राहिला आहे. तो ही आला तर काय बिघडेल असा खोचक सवाल त्यांनी केला.
तटकरेंना मंत्रिपद मिळालं, तुम्हाला कधी? गोगावलेंनी सांगितली पुढची तारीख….
ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार अर्थमंत्री होते. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना 25 लाख तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 90-90 लाख रुपये निधी दिला जात होता. आताही तसा प्रकार घडू नये यासाठीच अजित पवार यांना अर्थ खाते देऊ नये अशी आमची मागणी होती.
राज्य सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल अशी आशा शिंदे गटातील आमदारांना वाटत होती. परंतु, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीने ती शक्यताही मावळली आहे. आता आम्ही मंत्रिमंडळाच्या रेंजमधून दूर गेलो आहोत अशी टिप्पणी कडू यांनी केली.
राज्य सरकारच्या खाते वाटपानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी काहीही बोलणे झालेले नाही. आता येथे रेंजच नाही. या वाटेवर मंत्रालयाचे नेटवर्क येथे येत नाही. आम्ही मंत्रिमंडळाच्या नेटवर्कच्याही बाहेर आहोत. त्यामुळे त्यांच्याशी काहीच बोलणे झालेले नाही, असे कडू म्हणाले.
अजितदादा मुख्यमंत्री होणार का? उत्तर देताना बच्चू कडूंचंही तळ्यात-मळ्यात