अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, बीड विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा
जागा वाटपावरून योगेश क्षीरसागरांनी स्वतंत्र आघाडी तयार करून बीड नगरपरिषद निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. (Beed) 2 डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरच बीड जिल्ह्यांत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर योगेश क्षीरसागर आता कमळ हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.
बीड जिल्ह्यात पक्षांतराचं वार; खाडे पंडित धोंडे यांनी बदलले मार्ग, इतर नेतेही वाटेवर
बीड नगरपरिषद निवडणुकीमध्ये क्षीरसागर आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांमध्ये दुमत निर्माण झाले. जागा वाटपावरून योगेश क्षीरसागरांनी स्वतंत्र आघाडी तयार करून नगरपरिषद निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. स्वतंत्र आघाडी ही भाजपसोबत युती करून लढणार असल्याची माहिती होती. मात्र, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार योगेश क्षीरसागर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
योगेश क्षीरसागर काही वेळापूर्वीच राजीनामा दिला असल्याचं फेसबुक पोस्टवरून जाहीर केलं आहे.राजीनाम्यामध्ये स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलल्याने राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक युवा नेता बीडमधून भाजपच्या गळाला लागल्याचं स्पष्ट होतंय. आता योगेश क्षीरसागर हे कधीपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करतात किंवा पुढची त्यांची भूमिका कधी स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.
