‘केज’साठी पवारांनी हेरलाय भाजपचाच शिलेदार; माजी आमदार ठोंबरे ‘राष्ट्रवादी’च्या वाटेवर..
Beed News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला. त्यातही भाजपला जरा जास्तच नुकसान झालं. अनेक शिलेदारांचं पानिपत झालं. बीड मतदारसंघात तर दिग्गज नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला. महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे खासदार झाले. यामध्ये शरद पवारांचं राजकार सरस ठरलं. अजितदादांच्या शिलेदाराला गळाला लावून त्यांना निवडून आणण्याची किमया शरद पवारांनी साधली. आता हा ताजा इतिहास पुन्हा का सांगितला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आता अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज या संभाव्य राजकारणाबद्दलच जाणून घेऊ या..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे इच्छुकही फिल्डिंग लावत आहेत. आता बातमी आली आहे ती केज विधानसभा मतदारसंघातून. या मतदारसंघात लवकरच मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली. भाजप आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कट्टर समर्थक प्रा. संगीता ठोंबरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. स्वतः संगीता ठोंबरे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तरी देखील त्यांची निवडणूक लढण्याची तयारी आणि भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी भाजपला धक्का देणारा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको. संगीता ठोंबरे यांनी अजून तरी तसा निर्णय घेतलेला नाही. पण, सध्याची मतदारसंघातील परिस्थिती त्यांच्यासाठी प्रतिकूल बनली आहे. त्यामुळे जर त्यांनी असा निर्णय घेतला तर मुंडे भावंडांसाठी मोठा धक्का ठरू शकतो.
Pankaja Munde: राज्यात माझ्या निवडणुकीची चर्चा जास्त पण, आशीर्वाद द्यायलाच कुणी नाही
संगीता ठोंबरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट
भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्या खंद्या समर्थक म्हणून संगीता ठोंबरे यांची ओळख आहे. त्या शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जर ठोंबरेंनी खरंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मुंडे भावंडांसाठी धक्का ठरणार आहे. मांजरा धरण पाणीप्रश्न, एमआयडीसी, सूत गिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि अंबाजोगाई जिल्हा निर्मिती असे मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीता ठोंबरे पुन्हा मैदानात उतरल्या आहेत.
त्यांनी मतदारसंघातील शंभरपेक्षा जास्त गावांचा दौरा केला आहे. यंदा केज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडींत संगीता ठोंबरे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतल्याने नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर संगीता ठोंबरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का याबाबत अजून निश्चित नाही.
कोण आहेत संगीता ठोंबरे
संगीता ठोंबरे यांनी भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात सन 2012 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2012 मधील पोटनिवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पृथ्वीराज साठे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पुढे दोन वर्षांनी नमिता मुंदडा यांचा पराभव करुन त्या आमदार झाल्या. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून बीड जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची ओळख आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी कामांच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला.
Beed Politics : पंकजांविरोधात महायुतीनेच काम केलं, खांडेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
नमिता मुंदडा भाजपात अन् ठोंबरेंचा पत्ता कट
पुढे 2019 मध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीत संगीता ठोंबरे यांना डावलण्यात आलं. आता विधानसभा निवडणुकीतही संगीता ठोंबरे यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण पक्षाकडून पुन्हा एकदा नमिता मुंदडा यांनाच संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संगीता ठोंबरेंना अन्य पक्षात प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. शरद पवार गटाने जर त्यांना तिकीट दिलं तर केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असा सामना होण्याची दाट शक्यता आहे.
कसं आहे केजचं राजकीय गणित
केजच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या सून आहेत. उच्च शिक्षित आणि चांगला जनसंपर्क ही त्यांची खास ओळख. पण नजीकच्या काळात पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून नवी ओळख निर्माण करण्यातही त्या यशस्वी ठरल्या आहेत. बीडच्या राजकारणात मुंदडा घराण्याचा आजही दबदबा दिसून येतो. पण, बीडचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे आणि मुंदडा यांच्यात कधीच पटलं नाही. त्यामुळे माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर ते बजरंग सोनवणे यांच्यासाठी फायद्याचंच ठरणार आहे. केज मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे. वंजारी समाजाची सुमारे 80 हजार मतं आहेत. एकगठ्ठा मते असल्याने येथे वंजारी समाजाची मते निर्णायक मानली जातात. अन्य समाजघटकांचीही लोकसंख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे केजची निवडणूक यंदा राज्यात गाजणार अशीच चिन्हे आतातरी दिसत आहेत.