संतोष देशमुखांची टीप दिल्याचा ज्याच्यावर आरोप, त्याची होणार सुटका; आदेश काय?

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) शनिवारी मोठ्या घडामोडी घडल्या. सीआयडीने दोषारोपपत्र दाखल करत या प्रकरणी वाल्मिक कराडच (Walmik Karad) सूत्रधार असल्याचे म्हटले. तसेच आणखीही काही धक्कादायक खुलासे केले. यानंतर आता आणखी एक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेची सुटका करण्याचे आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात सीआयडीने काल आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एक म्हणून नमूद आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने तपास पूर्ण करून केजच्या न्यायालयात 1400 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराडला मुख्य सूत्रधार म्हटले आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे न्यायालयाने या प्रकरणातील सिद्धार्थ सोनवणे याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करावी असे न्यायालयाने म्हटले आहे.
Video : देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार कराडच; आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले
संतोष देशमुख यांचे अपहरण होण्याआधी सिद्धार्थ सोनवणे यानेच टीप दिली होती असा आरोप ठेवत सीआयडीने त्याला ताब्यात घेतले होते. सध्या सिद्धार्थ सोनवणे बीडच्या कारागृहात आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची सुटका होणार आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सिद्धार्थ सोनवणे यांची सुटका करावी असे आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत.
आरोपपत्रात नेमकं काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. या आरोपपत्रात आणखी काय खुलासे झाले आहेत ते पाहू या..
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एकम्हण म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या आरोपपत्रात विष्णू चाटे दुसर्या क्रमांकाचा आरोपी म्हणून नमूद आहे. 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शन घुलेच्या फोनवरुन वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना पाच महत्वाचे साक्षीदार सापडले. साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी वाल्मिक कराड विरुद्ध सर्व पुरावे गोळा केले.
संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार; आरोपपत्रात धक्कादायक खुलासा
सात तारखेला सुदर्शन घुलेचा वाल्मिक कराडला फोन आला होता. जो तो उठेल आणि आपल्या आड येईल त्या कुणालाही सोडणार नाही असे कराडने सुदर्शन घुलेला सांगितले होते. दोघांतील संवादानंतर सुदर्शन घुलेने पुन्हा अवादा कंपनीत कॉल करुन धमकी दिली. यानंतर 8 डिसेंबरला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची नांदूर फाटा येथील हॉटेलात भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप काय आहे ते सांगितले असे आरोपपत्रात म्हटले आहे.