छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका, ओबीसी-मराठा वादाला हिंगोलीतून फोडणी?
OBC reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षण नसल्याने लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली मराठा समाजाला काम करावे लागत आहे अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हिंगोलीतून प्रत्युत्तर दिले आहे. नवीन नेत्याने एक विषय मांडला. तुमच्या हाताखाली काम करणे आम्हाला शोभत नाही. ह्या लोकांची लायकी नाही. आमचे हे बॉस बनणार अन् आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणे हे शोभत नाही. त्यांचं म्हणणं की लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आरक्षणामुळे आली. का रे बाबा आमची लायकी काढतो? असा सवाल भुजबळांनी केला आहे.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणारे प्रत्येक आठरापगड जातीतील मावळ्याकडे लायकी होती म्हणून ते लढले, बहिर्जी नाईक रामोशी, कान्होजी आंद्रे कोळी, मदारी मेहता मुस्लीम, जीवा महाले आणि शिवा काशिद न्हावी, मल्हारराव होळकर आणि आहिल्यादेवी धनगर, अण्णाभाऊ साठे मातंग, बिरसा मुंडा आणि रामोजी भांगरे आदिवासी, लहुजी वस्ताद हे देखील मागासवर्गीय, एपीजे अब्दुल कमाल मुस्लीम, आता ह्यांची काय लायकी नव्हती का? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
‘ओबीसीतून एक टक्काही आरक्षण देणार नाही, वाकड्या नजरेनं पाहाल तर…; प्रकाश शेंडगेंचा इशारा
महात्मा फुलेंची लायकी होती म्हणून त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली, पहिला पोवाडा लिहिला, शिवजयंती सुरु केली, दुसरा पोवाडा मुस्लीम समाजाचे शाहीर अमर शेख यांनी लिहिला आणि अण्णाभाऊ साठे यांनी तिसरा पोवाडा लिहिला. देशाला संविधान दिले त्या बाबासाहेब आंबेडकरांची लायकी नव्हती का? कोणाची लायकी नव्हती? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
“प्रकाश आंबेडकरांनी अडचणीत असताना सहकार्य करावे” : छगन भुजबळ यांचे आवाहन
आमचा न्हावी तुमच्या समाजाचे केस कापतो, सोनार तुमच्यासाठी दागिने घडवतो, आमचा कुंभार तुमच्यासाठी मातीची भांडी घडवतो, कपडे आमचा शिंपी शिवतो, आमचा धोबी देखील तुमचा कपडे धुतो, तुमच्या शेतीची अवजारे आमचा सुतार बनवतो, आमचा वडार तुमच्यासाठी पाटे-वरवंटे तयार करतो, तुमच्या सत्काराची फुलं माळ्यांनी पिकवली, तुमच्या वाहना आमच्या चर्मकारांनी बनवल्या, आमच्या लोहारांनी तुमच्यासाठी हत्यारं बनवली आणि आमची लायकी काढता? अशी जहरी टीका छगन भुजबळ यांनी केली.