महायुतीच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटो वगळला; प्रीतमताई कडाडल्या, ‘मुंडे साहेबांचा फोटो वगळून…’
Pritam Munde : यंदा देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. राज्यातील महायुतीने आज प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे घेतले. बीडमध्ये महायुतीचा मेळावा झाला. मात्र, या मेळाव्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी या सगळ्या प्रकारावर भाष्य केलं. मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम होत असतील तर सहन करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला.
‘कारसेवक लाठ्या खात होते, तेव्हा तुम्ही वाघाचे फोटो काढत होता’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका
आज बीडमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यामेळाव्याला जिल्ह्यातील तीनही पक्षाचे नेते हजर होते. मात्र, महायुतीच्या या मेळाव्यात कार्यक्रमाच्या स्टेजवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हताा. त्यामुळं मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर मात्र, आयोजकांना ताबडतोब बॅनर बदलावे लागले. या प्रकरणावरून शरद पवार गटानेही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर महामेळाव्यात बोलतांना प्रीतम मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, मुंडे साहेबांचा फोटो भाजपच्या प्रोटोकॉलमध्ये येत नाही का? बीड जिल्ह्यामध्ये भाजपने स्व. मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही. मुंडे साहेंबाच्या नावाशिवाय महाराष्ट्रातील कुठलेही मोठी घडामोडी घडत नाही. त्या मुंडे साहेबांचा फोटो प्रोटोकॉलमध्ये नाही, हे कारण मनाला पटत नाही, अशी खंत देखील प्रीतम मुंडे यांनी बोलून दाखवली.
त्या म्हणाल्या, हा काही कुठला शासकीय वा प्रशासकीय कार्यक्रम नव्हता. त्यामुळं असं करणं चुकीचं आहे, यापुढं असं होता कामा नये. मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही, आणि त्याचं स्वागत करणार नाही. असं बीडमध्येच नाही तर महाराष्ट्राती कुठल्याही जिल्ह्यात होता कामा नये, असा इशारा प्रीतम मुंडे यांनी दिला. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमात अजित पवार गटाचे बीड विधानसभा प्रमुख योगेश क्षीरसागर यांचा फोटो नसल्याचेही पाहायला मिळाले. यावेळी योगेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. एकूणच या संपूर्ण प्रकरणाबाबत बीडमधील महायुतीत नेमके काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.