आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात वाळू माफियांचा धुमाकूळ, जप्त केलेला टेम्पो पळवला
तहसीलदार वैशाली पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो पकडून तहसील कार्यालयात लावला होता.
बीड जिल्ह्यातील आष्टी तहसील कार्यालयातून वाळू (Beed) माफियांनी चक्क जप्त केलेला वाळूचा टेम्पो पळवून नेल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. तहसीलदार वैशाली पाटील या रजेवर जाताच संधी साधून ६ ते ८ जणांच्या टोळीने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत हा प्रताप केला आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या तहसीलच्या आवारातच ही घटना घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
तहसीलदार वैशाली पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो पकडून तहसील कार्यालयात लावला होता. गुरुवारी वैशाली पाटील रजेवर गेल्या आणि प्रभारी तहसीलदार म्हणून विनोद रणविरे यांनी पदभार घेतला. रात्री ८:३० च्या सुमारास ६ ते ८ वाळू माफिया तहसील कार्यालयाच्या पाठीमागील भिंतीवरून आत शिरले. त्यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या दोन कोतवालांना धक्काबुक्की करत हुज्जत घातली.
जीवावर बेतणारा प्रसंग
माफियांनी जप्त केलेला टेम्पो चालू करून तो पळवण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. माफियांच्या या दहशतीमुळे कर्मचारी बाजूला झाले आणि त्यांनी टेम्पो पळवून नेला. माफियांचा दुसरा एक ट्रक पळवण्याचा प्रयत्न मात्र फसला.
सीसीटीव्ही आणि पोलिसांत तक्रार
या सर्व घटनेचा थरार तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती तात्काळ नायब तहसीलदार आणि जमाबंदी विभागाला देण्यात आली आहे. प्रभारी तहसीलदार विनोद रणविरे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, संबंधित गुंडांवर कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
