‘एकनाथ शिंदेंना अर्थमंत्री करा अन् अजितदादांना’.. ठाकरे गटाच्या नेत्याने दिला भन्नाट फॉर्म्युला
Maharashtra Political Crisis : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Political Crisis) आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली आहे.
सध्या अर्थ खात्यावरून तिढा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांतील या गोंधळावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी एक अनोखा सल्लाही दिला आहे.
अजितदादांना अर्थखातं; गोगावले, शिरसाटांचा पत्ता कट : भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे गौप्यस्फोट
अर्थ खात्यावरून चाललेल्या गोंधळावरून अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना अर्थमंत्रीपद देऊन हा तिढा सोडवावा असा खोचक सल्ला दानवे यांनी सरकारला दिला आहे.
भाजपने युती करण्यासाठी आधी शिवसेना आता राष्ट्रवादी पक्षातून अनेक नाग गळ्यात अडकवून ठेवले आहेत. त्यामुळे ते त्यांना काम करू देणार का, असा सवालही दानवे यांनी केला. मंत्रीपद मिळेल अशी स्वप्ने पाहणाऱ्या आमदारांनी शिवलेले कोट तसेच कपाटात राहतील असे चित्र सध्या दिसत आहे. जे सोबत आले त्यांना न्याय देणे शिंदे-फडणवीस सरकारला जमले नाही मग एका अपक्षाला काय न्याय देणार आहे. अजित पवार आधी भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीवर टीका करत होते. आता मात्र त्यांनाच स्वतःला दिल्लीवारी करत दिल्ली दरबारी मुजरे व हुजरेगिरी करावी लागत आहे, यापेक्षा दुर्दैव नाही अशी टीका दानवे यांनी केली.
शिंदे-फडणवीस-पवार सरकार टिकविण्याची जबाबदारी आता प्रसाद लाड यांच्यावर; बावनकुळेंची मोठी घोषणा
नेत्यांची दिल्लीवारी पण तोडगा नाहीच
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अजित पवार आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह 8 जणांनी शपथ घेतली त्याला आता बारा दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही त्यांना खातेवाटप झालेले नाही. यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाने अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, सहकार अशी वजनदार खाती मागितली आहे. त्यामुळे खातेवाटप अन् मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अडले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मॅरेथॉन बैठका होत आहेत तरीदेखील तोडगा निघालेला नाही. दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्यानंतरही परिस्थिती जैसे थे राहिली.