मनोज जरांगेंचे यांचे गणित लोकसभेला सुटणार : रावसाहेब दानवे अडचणीत
बोलण्यात बिनधास्त पणा, त्यात गावरान बाज अन् मुद्देसूद मांडणीपेक्षा अघळ-पघळ संवाद. या त्रिसुत्रीवर खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना मतदारसंघाला भाजपचा (BJP) बालेकिल्ला बनविले आहे. आतापर्यंत ते स्वतः या मतदारसंघातून पाचवेळा निवडून गेले आहेत. मात्र आता याच जालन्यात दानवेंना आव्हान देण्यासाठी एक मोठे नाव पुढे येत आहे. “हे नाव दानवेंना आव्हान तर देणारे आहेच, मात्र त्यांना आस्मान दाखवून जायंट किलरही ठरणारे नाव आहे. त्यामुळेच दानवेंची जागा धोक्यात आहे”, अशा चर्चा सध्या जालन्यात बघायला मिळत आहेत. (Possibility of Manoj Jarange vs Raosaheb Danve from Jalna Lok Sabha Constituency)
दानवेंची जागा धोक्यात आणणारे आणि भाजपचे टेन्शन वाढविणारे हे नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे यांना समाजाने डोक्यावर घेतलेले आहे. जालन्यासह महाराष्ट्रभर त्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. गावोगावी मराठा समाज जरांगेंच्या नेतृत्वात एकवटत आहे. जरांगे यांच्याच निमित्ताने एरवी फारसे चर्चेत नसलेला जालना जिल्हा मागील चार महिन्यांपासून कमालीचा चर्चेत आला आहे. जालन्यातील आणि महाराष्ट्रातील मराठा समाज सध्या जरांगेंचा शब्द म्हणजे अंतिम शब्द अशा भूमिकेत आला आहे. त्यामुळेच जरांगे यांच्या रुपाने जालन्याच्या राजकारणात नवीन नेतृत्व उभे राहिले असल्याचे बोलले जात आहे.
पण खरंच जरांगे पाटील विरुद्ध दानवे पाटील अशी लढत होऊ शकेल का? झाल्यास तुल्यबळ लढत होईल का? आणि मुख्य म्हणजे आतापर्यंत राजकीय आगमन नाकारणारे जरांगे पाटील कोणत्या पक्षाच्या झेंड्याखाली येणार? असे अनेक सवाल विचारले जात आहेत.
जालना जिल्हा दानवेंचा बालेकिल्ला :
गेली २० वर्ष एक हाती गड राखलेल्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना रिप्लेस करु शकेल असे नेतृत्व जिल्हात ना भाजपमध्ये उभे राहिले ना विरोधी पक्षात उभे राहु शकले. त्यामुळेच दानवे हे १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ असे पाचवेळा खासदार झाले. दोनवेळा केंद्रीय मंत्री झाले. मोठमोठ्या नावांचा केंद्रीय मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला पण दानवेंवरील जबाबदारी कायम राहिली.
जानला मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा असे चित्र १९९९ पूर्वी नव्हते. जनता पक्षाकडून १९७७-८० साली पुंडलिक हरी दानवे जनता पक्षाकडून विजयी झाले. १९८०-८४ आणि १९८४-८९ मध्ये काँग्रेस (आय)चे बाळासाहेब पवार विजयी झाले. १९८९-९१ साली भारतीय जनता पक्षाचे पुंडलिक हरी दानवे पुन्हा विजयी झाले. १९९१-९६ साली काँग्रेसचे अंकुशराव टोपे, १९९६-९८ आणि १९९८-९९ भाजपचे उत्तमसिंह पवार निवडून आले होते. अशा या आलटून पाटलून दोन्ही पक्षांना संधी देणाऱ्या मतदारसंघात १९९९ मध्ये रावसाहेब दानवे विजयी झाले आणि तेव्हापासून निर्विवादपणे दानवे विजयी होत आले आहे.
BJP : ‘नैतिकतेचं ढोंग रचू नका, आधी ‘मविआ’चं ऑडिट करा’; भाजपाचं ठाकरेंना रोखठोक उत्तर
विद्यमान स्थितीत जालना मतदारसंघात जालना जिल्हातील जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हातील सिल्लोड, फुलंब्री, पैठण अशा सहा विधानसभा मतदारसंघ समावेश होतो. या सहा ठिकाणी सध्या भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा एक आमदार येथे आहे. महायुतीच वर्चस्व, त्यात दानवेंचा प्रभाव या दोन गोष्टींमुळे सध्या दानवेंचे पारडे जड दिसत आहे. महायुतीचा भाग म्हणून आमदार अब्दुल सत्तार – सिल्लोड, संतोष दानवे, भोकरदन, नारायण कुचे-बदनापूर, मंत्री संदिपान्न भुमरे, पैठण आणि हरीभाऊ बागडे फुलंब्री हे खासदार दानवे यांना मदत करतील, यात शंकाच नाही.
सामाजिक परिस्थिती देणार जरांगेंना ताकद?
एका बाजूला राजकीय परिस्थिती दानवेंच्या बाजूने असली तरीही सामाजिक परिस्थिती जरांगेंना लाभदायी ठरु शकते. या सहा ही मतदार संघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात राहत आहे. मराठा समाजाच्या मताच्या जोरावर दानवे यांनी आतापर्यंत पाच वेळेस हा गड राखला आहे, मात्र या मतदार संघातील मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी समाज मराठा आरक्षणाच्या भावनिक मुद्यावर आपल्या बाजूने उभा केला आहे. एसी आणि ओबीसी समाज ही काही प्रमाणात जरांगेच्या मराठा हक्काच्या मुद्यावर सोबत असल्याचे चित्र आहे.
Sanjay Raut : ‘तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही’; राऊतांचा हल्लाबोल
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक जर दानवे विरुद्ध जरांगे झाली, तर दानवे यांनी फटका बसण्याची शक्यता आहे. जरांगे यांनी आरक्षणाचा भावनिक मुद्दा करून निवडणूक लढवली, तर त्यांना मतदारांची साथ मिळू शकते. याशिवाय जालना विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांच्याकडे असून इथे बंजार आणि ओबीसी समाज मोठा आहे. त्यामुळेच जरांगेंना इथून मदत मिळू शकते, मात्र त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाची मोट बांधण्याचे मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे.
जरांगे कोणत्या पक्षाकडून उभे राहणार?
रावसाहेब दानवे यांना आव्हान देऊ शकेल अशा सक्षम उमेदवाराची महाविकास आघाडीकडे वानवा आहे. यातूनच विरोधी पक्षाकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू असतानाच जरांगे हा सक्षम पर्याय होऊ शकतो ही चर्चा आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. परंपरेने हा मतदारसंघ आघाडीतील काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीने किंवा बहुजन आघाडीने आपल्याकडे घेतला आणि जरांगे पाटील यांचे मन वळवून उमेदवारी दिली, तर हा मतदारसंघ राखता येईल, असे चित्र आहे. जरांगे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) ने लाठी हल्ल्यानंतर दिलेला पाठिंबा आणि साथ या गोष्टीचा आधार प्रचारासाठी घेता येईल.
प्रकाश आंबेडकर फॅक्टरकडे लक्ष :
जालन्यात प्रकाश आंबेडकर यांचा फॅक्टर अत्यंत महत्वाचा ठरु शकतो. २०१९ ला वंचितच्या उमेदवाराने इथून ७७ हजार मते घेतली होती. नुकतेच आरक्षणासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला जरांगे पाटील यांनी ऐकला आणि तो अंमलातही आणला. त्यामुळे अनुसुचित जातीची सहानुभूती मिळण्याची त्यांना शक्यता आहे. त्यामुळे महाविकास (इंडिया) आघाडीत ही जागा बहुजन आघाडी सोडवून घेऊ शकते. मोठ्या प्रमाणात असलेला मराठा आणि जोडीला बहुजन व एसी समाज आल्यास ही जागा जिंकता येईल, असे आडाखे बांधले जात आहेत.
‘प्रकाश आंबेडकरांसाठी कोणतीही दारं बंद नाहीत’; वडेट्टीवारांनी एकदाचं सांगून टाकलं
इतर उमेदवारही चर्चेत :
२०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही नावे चर्चेत आली आहेत. आमदार राजेश टोपे यांचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात नसून परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. परंतु जालना लोकसभा उमेदवारीचा विषय निघाला की त्यांच्या नावाची चर्चा पक्षात हमखास असते. शिवाय दिवंगत पुंडलिकराव हरी दानवे यांचे सुपुत्र आणि भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे नावही चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून ते तीन वेळेस आमदारपदी निवडून आले होते. यासोबतच पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचे नावही इच्छुक उमेदवारांमध्ये घेतले जात आहे.