बच्चू कडू मागं हटेनात! सरकारच्या शिंष्टमंडळाने घेतली भेट, चर्चेअंती घेतला मोठा निर्णय

शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यापुढे सरकारची भूमिका मांडली तर बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सांगितले.

  • Written By: Published:
News Photo   2025 10 29T222311.731

प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन चांगलेच आक्रमक झालेत. (Kadu) न्यायालयाने आंदोलनाचे स्थळ रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर कडू यांनी थेट जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम्हाला अटक करा, ताब्यात घ्या अशी मागणी करत बच्चू कडू आणि इतर कार्यकर्ते, शेतकरी थेट पोलीस ठाण्याकडे निघाले आहेत. दरम्यान, बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले आहे.

शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यापुढे सरकारची भूमिका मांडली तर बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सांगितले. शेवटी आंदोलन न थांबवता बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी उद्या (30 ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असा निर्णय या चर्चेअंती झाला आहे. गृह (ग्रामीण) विभागाचे पंकज भोयार, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या शिष्टमंडळाने कडू यांची भेट घेतली.

आंदोलनस्थळी बच्चू कडू आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. त्यांनी केलेल्या मागण्याचा सरकार विचार करेल, असे या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. बच्चू कडू यांनी मात्र आम्ही कर्जमाफीवर ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय आहे? हे आम्हाला जाहीरपणे सांगा, अशी मागणी केली.

Video : बच्चू कडूंनी पहिले होकार अन् मग नकार कळवला; फडणवीसांनी मध्यरात्रीची घडामोड सांगितली

सुरुवातीला शिष्टमंडळाने बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र बच्चू कडू कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे हे सांगावे, या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगेच कॉल करावा आणि त्यांची भूमिका विचारावी, अशी मागणी केली. सुरुवातीला शिष्टमंडळाने फोन करण्यास टाळाटाळ केली. पण बच्चू कडू यांच्या पवित्र्यानंतर शिष्टमंडळाने बाजूला जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद केला. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन जयस्वाला आणि पंकज भोयार यांचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्याकडे गेले. त्यानंतर या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांची भूमिका मांडली.

शेवटी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांशी आंदोलन न थांबवता चर्चा करणार आहेत.मुख्यमंत्री आणि आपल्यात चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद पाडू, असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी आंदोलकांशी बोलताना दिला. सोबतच कोणीही आंदोलन थांबवणार नाही. कोणीही घरी जाऊ नका, असे आवाहन त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना दिले. बच्चू कडू आता मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता 30 ऑक्टोबरच्या चर्चेत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us