महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच भळभळत वास्तव; वाचा, ‘नॅशनल गुन्हे नोंद ब्युरोचा धक्कादायक अहवाल
शेती आणि शेतकरी कायम संकटाच्या भोवऱ्यात अडकलेली आपण पाहत आलो आहोत. नुकताच एनसीआरबीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) ने शेतकरी (Farmer Suicide) आत्महत्यांबद्दल एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, २०२३ मध्ये शेतीशी संबंधित १०,००० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, ज्यामध्ये शेतकरी आणि शेतमजूर दोघेही होते. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (३८.५%) आणि कर्नाटकात (२२.५%) झाल्या आहेत.
अहवालात म्हटले आहे की २०२३ मध्ये देशात १ लाख ७० हजारांहून अधिक आत्महत्यांची नोंद झाली होती, ज्यामध्ये केवळ शेतकरीच नाही तर बेरोजगार तरुण आणि व्यवसायाशी संबंधित लोकांचाही समावेश होता. दरम्यान, या अहवालात पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि गोवा यासह काही राज्यांमध्ये आत्महत्या झाल्याची नोंद नाही.
दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात 3% वाढ, पेन्शनधारकांनाही लाभ
एनसीआरबीच्या अहवालानुसार, आत्महत्यांमध्ये शेतकरी आणि शेतमजूर यांचा समावेश आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांची एकूण संख्या १०,७८६ इतकी आहे, ज्यामध्ये ४,६९० शेतकरी आणि ६,०९६ शेतमजूर आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये केवळ पुरुषच नाही तर महिलांचाही समावेश आहे.
यातील धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक गोष्ट म्हणजे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र (३८.५%), कर्नाटक (२२.५%), आंध्र प्रदेश (८.६%), मध्य प्रदेश (७.२%) आणि तामिळनाडू (५.९%) या राज्यात झाल्या आहेत. तथापि, अशी काही राज्ये आहेत जिथे शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत, ज्यात पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे.
अहवालात आत्महत्या करणाऱ्यांच्या आर्थिक स्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये असं आढळून आले की, २०२३ मध्ये बहुतेक आत्महत्याग्रस्तांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी होते. अहवालात असंही अधोरेखित करण्यात आलं आहे की, बेरोजगारी ही केवळ शेतकऱ्यांमध्येच नाही तर तरुणांमध्येही आत्महत्यांचे एक प्रमुख कारण आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.