मोठी बातमी! बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार, दुसऱ्यांदा बैठकीला मारली दांडी
नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण यावर संजय जाधव यांनी दिलं आहे.
विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाला गळती लागल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साध सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे एक खासदार साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला देखील उपस्थित नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला पुन्हा एकदा खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली आहे, त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठकी बोलावली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झालीच नाही, आंबेडकरांचा दावा भाजपने फेटाळला!
दरम्यान, नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण यावर संजय जाधव यांनी दिलं आहे. मात्र, एकीकडं खासदार संजय जाधव यांनी मातोश्रीवर आयोजित बैठकीला दांडी मारली आहे, तर दुसरीकडे मात्र ते मतदारसंघातील कार्यक्रमात दिसून येत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, दरम्यान या आधी देखील उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीला संजय जाधव यांनी दांडी मारली होती.
गेल्या मार्च महिन्यात उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा ते अनुपस्थित आहे. संजय जाधव यांच्यासोबतच परभणीचे जिल्हा प्रमुख गंगप्रसाद अहिरराव आणि चार तालुका प्रमुखांची देखील या बैठकीला अनुपस्थिति होती. मागच्या चार दिवसांपूर्वी परभणीच्या गेस्ट हाऊसमध्ये आयोजित बैठकीमध्ये संजय जाधव यांनी आपल्या मनातील अस्वस्था शिवसैनिकांसमोर बोलून दाखवली होती.