यावर्षी वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार; वाचा, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

Maharashtra Weather Update : उन्हाळ्याच्या कडाक्यातही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. यामुळे तापमानाचा पारा खाली आल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Weather) दरम्यान, अंदमान निकोबार बेटावरून मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली. वेळेआधीच मोसमी पाऊस निकोबार बेटांवर दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. केरळमध्ये एक जूनला तर मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्यानं यंदा १०५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. केरळमध्ये १ जूनला तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ८ जूनपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता आहे. एल निनोचा प्रभाव नसल्यानं अनुकूल वातावरणामुळे पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आनंदाची बातमी! राज्यातील या भागात 3 दिवसांत दाखल होणार मान्सून; होणार मुसळधार पाऊस
दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेरीस मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचा पट्टा लवकर तयार होईल. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येऊ शकतो. यंदा महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज आहे.
पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट
गेल्या दोन दिवसांपासून शहरात मंगळवारी (ता. ६) वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अद्ययावत निरीक्षणांनंतर आता हा अंदाज बदलला असून, बुधवारी (ता. ७) वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.