दादांवरील आरोपांचं गाठोडं फडणवीसांनी समुद्रात फेकून द्याव, रोहित पवार विधानसभेत बोलताना भावूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजितदादा जवळचे मित्र होते. आता फडणवीस यांनी अजितदादांवरील सर्व आरोपांचं गाठोडं समुद्रात नेऊन बुडवाव
आज सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Ajitdada) पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनंतर विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळाला दिला. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील भाषणात अजितदादांविषयीच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी रोहित पवार यांनी अश्रू अनावर झाले. त्यांनी सरकारला काही विनंतीही केली.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजितदादा जवळचे मित्र होते. आता फडणवीस यांनी अजितदादांवरील सर्व आरोपांचं गाठोडं समुद्रात नेऊन बुडवाव, तीच त्यांना श्रद्धांजली असेल असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.
गेले 25 -30 वर्ष अजितदादांसोबत काम केलं; एकनाथ शिंदेंना अजितदादांची आठवण
अजित पवार हे सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता असायचे. चुकले तर कान पकडायचे व चांगले बोललो की स्तुती करायचे. व्यक्तिगत, बेकायदेशीर विषय घेऊन आलेल्यांचा त्यांना राग यायचा, अशी आठवण रोहित पवार यांनी काढली. दादांवर नको नको ते आरोप झाले. दादा तेव्हा अस्वस्थ व्हायचे. पण एकही आरोप सिद्ध करता आला नाही. दादा आता नाहीत, त्यामुळे ते आरोप व ते डाग आता पुसले पाहिजेत. आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकले गेले तर ती त्यांना आदरांजली ठरेल, अशी मागणीही त्यांनी केली.
माझं लग्न हे दादांनी ठरवलं होतं. पक्ष वेगळा झाला तेव्हा काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील. गेल्या काही महिन्यात आमच्या बैठका झाल्या. प्रशासनावर वचक असणारा नेता गेला. लोकनेता गेला, रूबाब गेला. रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला, अशा शब्दांत त्यांनी हळहळ व्यक्त केली.
अजितदादा मला झिपऱ्या कमी कर म्हणायचे. राजकीय वजन वाढवत जा. शारीरिक वजन कमी कर असं बोलायचे, अशी आठवण सांगताना रोहित पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर बोलताना आता मी जो लढा लढतोय, या लढ्याबद्दल दादाही मला शाबासकी देतील, असे म्हणत दादांच्या मृत्यूबद्दल आरोपींना तुरूंगात टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.
