रतन टाटांना ‘भारतरत्न’ मिळावा! मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव संमत; केंद्राला विनंती करणार
Ratan Tata For Bharat Ratna : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचं (Ratan Tata) बुधवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने आज राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द केले आहेत. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला. रतन टाटांनी केलेलं कार्य लक्षात घेता त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
Ratan Tata: तुम्ही गेलात… कधीकाळी रतन टाटा यांना डेट करणाऱ्या अभिनेत्रीला शोक अनावर!
रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. देशाच्या जडणघडणीत टाटा समुहाचं सुरुवातीपासूनच मोठं योगदान राहिलं. रतन टाटा यांनीही आपल्या कुटुंबाचा हा वारसा पुढे चालवला. आज सायंकाळी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्य सरकारकडून संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह विविध विभागांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
टाटांना भारतरत्नसाठी थेट कोर्टात याचिका
देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रदान करून रतन टाटा यांचा गौरव करावा या मागणीने मोठा जोर धरला होता. हायकोर्टात या मागणीसाठी चक्क याचिकाही दाखल झाली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यास विनम्र नकार दिला होता. तरीही ही मोहीम जोरात सुरू होती. मात्र स्वतः रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन हे सर्व थांबवा, अशी जाहीर विनंती केली होती. 2008 मध्ये रतन टाटा यांना आपल्या देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्वविभूषण प्रदान करून गौरविण्यात आलं होतं. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, ऑर्डर ऑफ ब्रिटिश या आंतरराष्ट्रीय सन्मानांनीही रतन टाटा यांचा गौरव करण्यात आला होता.
OK TATA : ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओके टाटा शब्दांचा अन् रतन टाटांचा संबंध काय?