अहिल्यानगर महापालिकेत जय-विरुचा बोलबाला; कळमकर, लंकेचा धुव्वा
आजच्या मतमोजणीनंतर अनेक प्रभागांमध्ये स्पष्ट निकाल समोर आले असून राजकीय समीकरणांमध्ये बदल घडताना दिसत आहेत.
NCP-BJP alliance – महानगरपालिका निवडणुकांच्या निकालात विविध प्रभागांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मतमोजणीनंतर अनेक प्रभागांमध्ये स्पष्ट निकाल समोर आले असून राजकीय समीकरणांमध्ये बदल घडताना दिसत आहेत.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी करत उमेदवार सागर बोरुडे आणि संपत बारस्कर यांनी विजय मिळवला आहे. याच प्रभागात भाजपच्या दीपाली बारस्कर आणि शारदा ढवण यांनीही बाजी मारत विजय नोंदवला आहे. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात जागांची बरोबरी दिसून येते.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केलं आहे. या प्रभागातील चारही जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटीया आणि अविनाश घुले यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्वच्छ विजय मिळवला असून हा प्रभाग पूर्णपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला आहे.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये त्रिकोणी लढतीत भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला आहे. भाजपच्या दत्ता गाडळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव केला आहे. तर भाजपचे सुजय मोहिते यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांना पराभूत केलं आहे. या प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पौर्णिमा गव्हाळे आणि गीतांजली काळे यांनी विजय मिळवत पक्षाची ताकद वाढवली आहे.
महानगरपालिकांच्या निकालांचा रणसंग्राम; पाहा मराठवाड्यात A टू Z अपडेट
प्रभाग क्रमांक 16 मध्येही भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी पाहायला मिळाली. भाजपचे विजय पठारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओंकार सातपुते यांचा पराभव केला. भाजपचे अमोल येवले यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन कोतकर यांना पराभूत केलं. तर राष्ट्रवादीच्या सुनीता कांबळे आणि वर्षा काकडे यांनी विजय मिळवत या प्रभागात पक्षाची उपस्थिती मजबूत केली आहे.
प्रभाग क्रमांक 17 मध्येही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात जागा वाटून घेतल्याचं चित्र आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मयूर बांगरे आणि अश्विनी लोंढे यांनी विजय मिळवला असून भाजपच्या कमल कोतकर आणि मनोज कोतकर यांनीही यश संपादन केलं आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दिलासा देणारा निकाल लागला आहे. शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे आणि आसाराम कावरे यांनी विजय मिळवत या प्रभागात पक्षाची पकड कायम ठेवली आहे.
एकूणच या निकालांमधून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद अनेक प्रभागांमध्ये वाढल्याचं स्पष्ट होत असून शिंदेंच्या शिवसेनेला काही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. अंतिम आकडेवारीनंतर महानगरपालिकेतील सत्तासमीकरण नेमकं कसं असेल, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
