अजितदादा, जयंत पाटलांना बाजूला ठेवत पवारांनी उभारली नवी टीम; कोणाकडे कोणती जबाबदारी?

अजितदादा, जयंत पाटलांना बाजूला ठेवत पवारांनी उभारली नवी टीम; कोणाकडे कोणती जबाबदारी?

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. पक्षात आता कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही कार्यकारी अध्यक्ष पक्षाचे प्रमुख या नात्याने काम करणार आहेत. (NCP National Working Committee, Sharad Pawar President, Supriya Sule and Praful Patel Executive President)

याशिवाय सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगेंद्र शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. मोहम्मद फैजल अशा नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करत त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. सहकाऱ्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याच मत या निर्णयाच्या घोषणेनंतर बोलताना शरद पवार यांनी अधोरेखित केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाकडे कोणती जबाबदारी?

शरद पवार – राष्ट्रीय अध्यक्ष

प्रफुल्ल पटेल – कार्यकारी अध्यक्ष (मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी. राज्यसभा कामकाज जबाबदारी. याशिवाय पक्षाच्या आर्थिक घडामोडी)

सुप्रिया सुळे – कार्यकारी अध्यक्ष (महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी. महिला विंग, युथ विंग, विद्यार्थी संघटना आणि लोकसभा कामकाज जबाबदारी. याशिवाय केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षा)

सुनिल तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस (ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांची जबाबदारी. याशिवाय अधिवेशन आणि परिषदा, निवडणूक समिती, अल्पसंख्यांक विभाग आणि किसान सेल)

डॉ. योगेंद्र शास्त्री – राष्ट्रीय सरचिटणीस (सेवा दलाची जबाबदारी, दिल्ली राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष)

के. के. शर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस (उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांची जबाबदारी. याशिवाय पंचायत राज विभागाची जबाबदारी)

पी. पी. मोहम्मद फैजल – राष्ट्रीय सरचिटणीस (तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या राज्यांची जबाबदारी. याशिवाय परदेशातील व्यवहारांची जबाबदारी)

नरेंद्र वर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस (ईशान्येकडील राज्यांची जबाबदारी. याशिवाय माध्यम आणि माहिती तंत्रज्ञान विभाग जबाबदारी)

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रीय सरचिटणीस (बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, आणि कर्नाटक या राज्यांची जबाबदारी. याशिवाय कामगार विभाग, एससी, एसटी आणि ओबीसी विभाग, सहकार विभाग, ग्राहक संरक्षण विभाग जबाबदारी)

एस. आर. कोहली – राष्ट्रीय सरचिटणीस (माध्यम, प्रसिद्धी, प्रशासन, सर्व राज्यांमधील कार्यालयीन समन्वय, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना विविध राज्यांमध्ये मदत करणे, निवडणूक आयोगातील समन्वय या प्रमुख जबाबदाऱ्या)

हे सर्व राष्ट्रीय सरचिटणीस दोन्ही कार्याध्यक्षांच्या सल्ल्यानेच काम करणार असून विविध महत्वाच्या निर्णयांबाबत कळविणे बंधनकारक असणार आहे.

नव्या कार्यकारिणीतून पाटील-पवारांना वगळलं :

मात्र या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्यकारी अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने उठून निघून गेले. यामुळे देखील पवार नाराज आहेत का? असा सवाल विचाराला जात आहे. मात्र या चर्चांचे जयंत पाटील यांनी खंडन केले आहे. त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावतीने भूमिका मांडत ते नाराज नसल्याचे स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube