माजी मंत्री अन् आमदारांच्या हाती घड्याळ; प्रवेश होताच अजितदादांचा कार्यकर्त्यांना टास्क

माजी मंत्री अन् आमदारांच्या हाती घड्याळ; प्रवेश होताच अजितदादांचा कार्यकर्त्यांना टास्क

Ajit Pawar : बेरजेचे राजकारण करत सर्व जातीधर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करु या. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष करु या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील असंख्य शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍यांनी आज केसी कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप वाघ यांचाही यात समावेश होता.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या. आम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात जातपात, धर्म कधी पाहिला नाही. शिवसेना तुम्हाला चालत असेल तर भाजप का चालत नाही? काहीजण सोयीनुसार कार्यकर्त्यांना सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार होते त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे असे ठरले होते. याला सर्वच आमदार साक्षीदार आहेत ही माहिती देतानाच मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही.

लोकांचे प्रश्न सुटावे, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी काम करत आलो आहे. राज्यात उभारली जाणारी महापुरूषांची स्मारके भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल अशी कामे सरकार करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराशिवाय काहीच करता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरातून हाताला काम मिळणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार? दमानिया यांचा मेसेज व्हायरल..

यावेळी पक्षात प्रवेश देत असल्याचे जाहीर करतानाच प्रवेशकर्त्यांचे अजित पवार यांनी पक्षात स्वागत केले. उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊ या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. खानदेशातील फार मोठी ताकद आज पक्षात आली त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी सर्वांचे स्वागत केले. पक्षाची जुळलेली नाळ कायम ठेवलीत आणि विचारांपासून कधी ढळला नाहीत त्याबद्दल प्रवेशकर्त्यांचे आभार मानले.

राजकारणात आपला ठसा अजितदादांनी उमटवला आहे. दिलेला शब्द पाळणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा एकमेव नेता आहे असे सांगतानाच विक्रमी अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला आहे. सर्वाधिक उपमुख्यमंत्री पदाची शपथ दादांनी घेतलेली आहे आणि भविष्यात अजून एक अपूर्ण राहिलेले स्वप्न आपल्या कार्यकर्त्यांना मिळून पूर्ण करायचे आहे असे आवाहनही सुनील तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादीत ‘या’ नेत्यांनी केला प्रवेश

जळगाव जिल्हयातील माजी मंत्री सतिश पाटील , माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, धुळ्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, उत्तरविभागीय अध्यक्ष शरद पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. याशिवाय जळगाव, धुळे, नंदुरबार, रावेर येथील जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे संचालक, पंचायत समिती, बाजार समिती मधील शरद पवार गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, सुरेखाताई ठाकरे,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, भुईखेडकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामराजे निंबाळकर यांना चौकशीसाठी नोटीस; मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणाच कनेक्शन काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube