जळगावमध्ये ठरलं! भाजप, शिंदे अन् अजित पवार गटाच्या ‘या’ तिघांचं मंत्रिपद फिक्स
Jalgaon News : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी नागपुरात होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळापासूनच भावी मंत्र्यांचे फोन खणखणू लागले आहेत. मंत्रिपदासाठी नावे निश्चित करताना राज्यातील विभागांचा समतोल साधला गेला का याचं स्पष्ट उत्तर शपथविधीनंतरच मिळणार आहे. मात्र तरीही सध्या मंत्रिपदावरून विविध चर्चा सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातून कुणाला मंत्रिपद मिळणार याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तसेच अजित पवार गटाचे अनिल पाटील आणि भाजपाचे गिरीश महाजन यांनाही मंत्री म्हणून संधी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले. गिरीश महाजन यांना शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांनी कडवी टक्कर दिली. त्यामुळे महाजन यांचा फक्त 23 ते 24 हजार मतांच्या फरकाने विजय झाला. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुलाबराव देवकर तर अजित पवार गटाचे अनिल पाटील यांना अपक्ष उमेदवार शरद चौधरी यांनी आव्हान दिले होते. परंतु, या लढतीत महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकावला. यानंतर आता या तिघांचं मंत्रिपद जवळपास फिक्स झालं आहे.
नितेश राणे, पंकजा मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन, भाजपकडून आणखी कोण घेणार शपथ? अन् कुणाचा पत्ता कट?
दरम्यान, नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करण्यास सुरुवात केली. बावनकुळे यांनी नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना फोन केल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत आतापर्यंत पंकज भोयर यांचे नाव समोर आलं नाही. मात्र आज बावनकुळे यांनी पंकज भोयर यांना मंत्रीपदासाठी फोन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने यंदा मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.