‘राम शिंदेंची मैत्री, विखेंना विरोध अन् अमोल कोल्हेंना आमंत्रण’; आ. लंकेंच्या मनात नेमकं काय?

‘राम शिंदेंची मैत्री, विखेंना विरोध अन् अमोल कोल्हेंना आमंत्रण’; आ. लंकेंच्या मनात नेमकं काय?

Nilesh Lanke : नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चाणाक्ष आमदार म्हणून निलेश लंके (Nilesh Lanke) ओळखले जातात. शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात करणारे निलेश लंके आता आमदार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली आहे. नगर दक्षिण मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे यांना भाजप पुन्हा तिकीट देईल अशी चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला अजूनही विखेंविरोधात तगडा उमेदवार मिळालेला नाही. दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची ही वाणवा कोण भरून काढणार? अशी चर्चा सुरू असतानाच निलेश लंके यांच्या तिरक्या चालींनी सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे.

भाजप आमदार राम शिंदेंसोबत विविध कार्यक्रमांना हजेरी, सुजय विखेंवर सडकून टीका अन् आता तर विरोधी पक्षातील खासदार अमोल कोल्हे यांनाच आमंत्रण. या घटनांनी वेगळाच पॉलिटिकल मेसेज दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके पुन्हा पक्ष बदलणार का? या चर्चा कितपत खऱ्या आहेत. खरंच राजकारणाचे काटे या पद्धतीने फिरणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेतील शिवसैनिक त्यानंतर अल्पावधीतच पारनेर तालुकाप्रमुख म्हणून नावारुपास आलेले निलेश लंके सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सन 2018 मध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पारनेर दौऱ्यावर असताना दगडफेकीची घटना घडली होती. यानंतर निलेश लंके यांना शिवसेनेतून काढण्यात आले. त्यानंतर पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होत्या. निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत तिकीट मिळवले. मतदारसंघातील लोकप्रियता, सामान्यांसाठी केलेल्या कामांच्या जोरावर या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन विधानसभा उपसभापती विजय औटी यांचा दणदणीत पराभव केला.

अजितदादांची जहरी टीका : पण आता त्यांच्या नाकावर टिच्चून सुप्रियाताई स्वीकारणार संसद महारत्न पुरस्कार

आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासाची कामे आणि सर्वसामान्यांची कामे करून जनाधार वाढवला. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात चांगली कामे केली. पुढेही लंकेच आमदार असतील असा विश्वास लोकांना वाटत असतानाच राज्याच्या राजकारणाला धक्का देणारी घटना घडली. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर आमदारांचा एक मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला. आता आपण काय करावे या द्विधा मनस्थितीत असतानाच निलेश लंके यांनीही गट बदलला. शरद पवारांची साथ सोडून अजितदादांबरोबर जाणे पसंत केले.

या घडामोडीमुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला. आजमितीस जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे फक्त दोन आमदार आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे चार आमदार आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच अजितदादांची ताकद वाढली आहे. या गोष्टीचा विचार करून पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

“लहानपणीची आठवण” लेकाचा कंठ दाटला, ‘बाप’ही गहिवरला; श्रीकांत शिंदेंच्या भाषणातच मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांत पाणी

विधानसभा निवडणूक अजून लांब आहे. त्याआधी लोकसभेची निवडणूक होणार आहे. आमदार निलेश लंके यांनी या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी, खासदार सुजय विखेंना विरोध, भाजप आमदार राम शिंदे यांच्याबरोबर कार्यक्रमात हजेरी, मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी, सभा अन् मेळावे या माध्यमातून वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालवला आहे. आता तर त्यांनी थेट शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना महानाट्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रण दिलं आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील ज्या नेत्यांवर अजित पवारांचा रोष आहे त्यात अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे सुद्धा अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. याच अमोल कोल्हेंना आमंत्रित करून निलेश लंकेंनी वेगळा पॉलिटिकल मेसेज दिला आहे. या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून निलेश लंके यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज आता येत नसला तरी आगामी काळात निलेश लंके अजितदादांची साथ सोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज