“लहानपणीची आठवण” लेकाचा कंठ दाटला, ‘बाप’ही गहिवरला; श्रीकांत शिंदेंच्या भाषणातच मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांत पाणी

“लहानपणीची आठवण” लेकाचा कंठ दाटला, ‘बाप’ही गहिवरला; श्रीकांत शिंदेंच्या भाषणातच मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांत पाणी

Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पहिलंच महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडतंय. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित आहेत. मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी सहसा राजकारणात फारसा दिसत नाही असा प्रसंग घडला. व्यासपीठावर खासदार मुलगा भाषण देत होता. त्याचं भाषणही दमदार झालं. या भाषणात खा. श्रीकांत शिंदे यांनी अशी एक आठवण सांगितली जी मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोळ्यांत पाणी आणून गेली. शिंदे यांच्यातील बापमाणूसही गहिवरला. लेकाचं भाषण ऐकताना हळूच रुमालाने डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा टिपत होता. श्रीकांतचं भाषण ऐकताना सगळा प्रवास डोळ्यांसमोरून निघून गेला, असं भावनिक ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं.

खरंतर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचं तोंडभरून कौतुक केलं. इर्शाळवाडीतील दुर्घटना असो की आणखी कोणता प्रसंग. मुख्यमंत्री शिंदे तिथे हजर असायचे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच शिवसैनिकांना प्राधान्य दिलं. मी ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमात जातो. मुलाखतीला जातो. त्यावेळी मला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की शिंदे साहेबांबरोबरची एखादी चांगली आठवण सांगा. पण, मी आज तुम्हाला सांगतो शिंदे साहेबांना ज्या ज्या वेळी पाहिलं त्या त्या वेळी शिवसैनिकांमध्येच पाहिलं. मला एकही लहानपणाची अशी एकही घटना आठवत नाही ज्यावेळी शिंदे साहेबांनी आमच्याबरोबर काही क्षण व्यतित केले असतील, असे सांगताना श्रीकांत शिंदे यांचे डोळे पाणावले होते. समोर उपस्थित शिवसैनिकांचीही तीच अवस्था झाली होती.

या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक ट्विट केलं. सगळा प्रवास झरकन डोळ्यांसमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवेसना हे कुटुंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटुंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.

शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं. शिवसैनिक हेच माझं कुटुंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला कल्पना नव्हती. नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने कधी मागे वळून पाहिले नाही. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला.

शिवसेना या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटुंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचल ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दांत मांडले, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाचं कौतुक केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज