खात्यात पैसे येताच फटाके फोडून जल्लोष; नगरमधील बहिणींनी मानले सरकारचे आभार
लाडकी बहिण योजनेत खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.
अहमदनगर : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने पोस्ट ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने (अजित पवार) महिलांनी पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, महायुती सरकारकडून राबवण्यात आलेल्या या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवली. रक्षाबंधना पूर्वी पैसे खात्यात जमा झाल्याने महिलांनी फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला.
राज्यात महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन देत जुलै महिन्याचा पहिला व ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता रक्षाबंधनाला देण्याचा शब्द दिला होता. सरकारने हा शब्द पाळला. रक्षाबंधना आधी लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळाले. खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून या सर्वसामान्य महिलांना मोठा हातभार मिळाला आहे.
लाडकी बहिण योजनेत महत्वाची अपडेट; देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या 17 तारखेपर्यंत…
गेल्या दोन महिन्यांपूर्वी लाडकी बहिण योजनेचे घोषणा करत अर्ज प्रक्रिया राबविली. सुरुवातीला विविध कागदपत्रांमुळे महिलांनी बँक, सेतू केंद्र, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या. नंतर अर्जात सरकारने आणखी सुधारणा केली. त्यामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. नगरमध्ये महिलांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे संपर्क कार्यालय येथे लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरणा केंद्र सुरू केले. येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत योजनेचे अर्ज दाखल केले.
स्वतः आमदार जगताप यांनी महिलांचे अर्ज भरुन घेतले. तसेच नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामार्फत प्रभागनिहाय अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली. कागदपत्रे काढण्यासाठी मदत केली. यामुळे महिलांच्या अडचणी कमी झाल्या.
महिलांचा सरकारवरील विश्वास वाढला
महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणून दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, विरोधकांकडून निवडणुकीच्या तोंडावर योजना आणल्याचे सांगत पैसे मिळतील की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर दौरा करत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला पहिले दोन हप्ते मिळतील असे आश्वासन दिले होते. रक्षाबंधनच्या अगोदरच महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने महिलांकडून सरकारचे आभार मानण्यात आले.
Exclusive: CM एकनाथ शिंदेची सिनेमात एन्ट्री, ‘धर्मवीर 2’ मध्ये साकारणार स्पेशल रोल
