निलेश लंके खासदार आता पारनेरचा आमदार कोण?; मविआ अन् महायुतीचं गणित काय..
Elections 2024 : लोकसभा निवडणूक झाल्या आता (Elections 2024) विधानसभा निवडणुका काही महिन्यांमध्ये होणार आहेत. यंदा नगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असेल. याला कारणही आहे. गेल्या निवडणुकीमध्ये माजी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढवली व खासदारही झाले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून पारनेरमधून खासदार लंकेंच्या पत्नी राणी लंके या विधानसभा निवडणूक लढतील अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे माजी आमदार विजय औटी हे देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहे. यामुळे कोण होणार पारनेरचा आमदार याचं उत्तर लवकरच मिळणार आहे.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) मैदानात रंगणारी लढत म्हणजे पवार विरुद्ध पवार. म्हणजेच अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट होय. यातच पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत तुतारी हाती घेत खासदारकीला गवसणी घातली. लंके खासदार झाले मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेरमध्ये आमदार कोण होणार या चर्चा रंगल्या आहेत. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचे नाव समोर आले आहे. राणी लंके या जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात माजी आमदार विजय औटी हे उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विजय औटी हे तीन टर्मचे आमदार आहे. पारनेरमध्ये लंके विरुद्ध औटी असा सामना होऊ शकतो अशी चर्चा आहे.
मोठी बातमी : लोकसभा अध्यक्षपदी ओमप्रकाश बिर्लांची पुन्हा निवड; ‘इंडिया’ आघाडीची खेळी फेल
राणी लंके भावी आमदार…
गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी राणी लंके यांचे नाव देखील चर्चेत होते. त्यांनी गावपातळीवर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आपला जनसंपर्क देखील वाढवला होता. मात्र निलेश लंके यांनी अजित पवार गटातून बाहेर पडत शरद पवारांच्या पक्षाकडून लोकसभा लढवत खासदारकी मिळवली. लंके खासदार झाल्यांनतर त्यांच्या पत्नी राणी लंके या भावी आमदार म्हणून पारनेरमध्ये फलक देखील झळकू लागले होते. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे पारनेरमधून राणी लंके यांचे नाव आमदारकीच्या रेसमध्ये आहे. तसेच लंके कुटुंबियांसाठी असलेला मतदारसंघातील वलय पाहता ही निवडणूक त्यांच्यासाठी अनुकूल राहू शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
औटी पुन्हा करिश्मा दाखवणार का?
पारनेर मतदारसंघामध्ये एक प्रबळ उमेदवार म्हणून विजय औटी यांचे नाव देखील चर्चेत आहे. विजय भास्करराव औटी हे शिवसेनेचे नेते आहेत. औटी हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेचे उपसभापती होते. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये पारनेर मतदारसंघातून सलग तीन वेळा औटी निवडून आले. त्यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांची मतदारसंघावर आजही चांगली पकड आहे. मूळ शिवसैनिक असलेले औटी यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीधर्म झुगारत प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. विखेंच्या मदतीला धावणारे औटी यांच्यासाठी व लोकसभेचा वचपा काढण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे हे औटींसाठी विधानसभेच्या मैदानात उतरू शकतात अशी चर्चा आहे. यामुळे लंके यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्यासमोर तीन टर्मचे आमदार राहिलेले विजय औटी यांचे कडवे आव्हान राहू शकते.
‘इंडिया’चा हिट फॉर्म्युला ‘मविआ’ रिपीट करणार; विधानसभेत महायुतीच्या कोंडीचं खास प्लॅनिंग
‘या’ उमेदवारांचीही चर्चा
निलेश लंके खासदार झाले यामुळे आता राणी लंके यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरु असली तरी मात्र महाविकास आघाडीतील काही इच्छुकांना देखील विधानसभेचे वेध लागले आहेत. यामुळे नीलेश लंके यांची देखील तिथे डोकेदुखी वाढणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. भास्कर शिरोळे, माजी सभापती संदेश कार्ले यांची नावे विधानसभेसाठी चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या सर्वांच्या मातोश्रीवर फेऱ्या देखील वाढल्या असल्याने येणाऱ्या काळात यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होऊ शकतो.
तर दुसरीकडे महायुतीकडून देखील अनेकजण इच्छुक आहेत. भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पारनेर तालुक्यात चांगले संघटन आहे. त्यामुळे भाजप देखील मतदारसंघावर दावा सांगू शकतो. तर शरद पवार यांना शह देण्यासाठी अजित पवार देखील पारनेर मतदारसंघातून उमेदवाराची चाचपणी करत आहेत. यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ राज्यात चर्चेत ठरण्याची शक्यता आहे.