राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंके? जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा
Jayant Patil : पारनेर-नगर मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) हे ठरविणार आहेत. लंके यांनी नाव घ्यावे मी लगेच एबी फॉर्मवर सही करतो असे सांगत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) या मतदारसंघाच्या उमेदवार राणीताई लंके याच असतील असे अप्रत्यक्षपणे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी सायंकाळी निघोजमध्ये पोहोचल्यानंतर मळगंगा मंदिरासमोर झालेल्या सभेमध्ये पाटील बोलत होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, महेबूब शेख, मा. आ. राहुल जगताप, स्वप्निल गायकवाड, अतुल लोखंडे, राणीताई लंके, अर्जुन भालेकर, अॅड. राहुल झावरे, बाबाजी तरटे, सुवर्णा धाडगे, लकी कळमकर,डॉ. बाळासाहेब कावरे, सतिष गव्हाणे, वसंत कवाद, ठकाराम लंके, सोमनाथ वरखडे, शिवाजीराव लंके यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
जयंत पाटील म्हणाले, पारनेर-नगर मतदारसंघात उमेदवारी कुणाला द्यायची ते आम्ही खासदार साहेबांवर सोडले आहे. तुम्ही सर्वानुमते ठरवा कुणाला उमेदवारी द्यायची. खा. लंके यांनी नाव घ्यावे. नुसते नाव नव्हे तर ते उखाण्यात घ्यावे. शरद पवारांपुढे त्यांनी उखाण्यात नाव घेतल्यावर मी त्यांच्या एबी फॉर्मवर लगेच सही करेल असे सांगत विधानसभेच्या उमेदवार खा. लंके यांच्या पत्नी राणीताई लंके याच असतील असे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले.
Jayant Patil : चादर लगी फटने, खैरात लगी बटने.. जयंत पाटलांचा महायुतीला टोला
राज्य सरकारच्या वतीने शिर्डी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पाच ते सात कोटी रूपये खर्च करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांना घेऊन जाण्यासाठी एसटी बसचा वापर करण्यात आला पण दुसरीकडे शिक्षणासाठी एसटीने प्रवास करणारे विद्यार्थी रस्त्यावर ताटाकळत उभे असल्याचे जिल्हाभर पहावयास मिळाले. सरकारच्या सत्तेच्या गैरवापराला पारावार राहीलेला नाही. सरकार आपल्या दारी या कार्यक्रमासाठी महिना महिनाभर दाखले रखडवण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. आतापर्यंत कधीही झाला नाही इतका खर्च या सरकारने जाहिरातींवर केला अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
लंके पक्षात आले अन् इनकमिंगच सुरू
खासदार नीलेश लंके यांचे कौतुक का ? तर आमच्याकडे कुणी येण्यास तयार नव्हते त्यावेळी ते आमच्या पक्षात आले. त्यांनी कोणत्या ज्योतिषाकडे पाहिले हे माहीती नाही परंतु त्यांनी सुरूवात केली आणि राज्यभरातून पक्षात इनकमिंग सुरू झालं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ४८ पैकी ३१ जागा निवडून आल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
आम्हाला फ्री हँड द्यावा लागेल
लोकसभा निवडणुकीत दुसऱ्याचं इंजेक्शन लागू पडलं नसतं, त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. आता आपले सरकार सत्तेवर येणार असून त्यावेळी आम्हाला फ्री हॅण्ड द्यावा लागेल. निवडणुकीच्या काळात माझा अपघात घडवून आणण्याचाही प्रयत्न झाला. माझ्यात हिंमत होती म्हणून या निवडणूकीत मी यश मिळवू शकले असे खासदार निलेश लंके यावेळी म्हणाले.
याच जनतेने मला सरपंच ते खासदार बनविले. २०१९ मध्ये याच निघोजमध्ये जनसंवाद यात्रेची सभा झाली. यंदाही निघोजमध्ये होत आहे. २०१९ मध्ये राज्यात परिवर्तन झालं. आता विधानसभेतही परिवर्तन होईल. कारण माता मळगंगेचा आशिर्वाद असल्यावर अपयश येण्याचे कारण नाही. ज्याची पहिली सभा होईल त्याला अडचण येत नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार एक लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केला.