Dindori Lok Sabha : घरच्याच मतदारांनी नाकारलं; कळवणमध्ये भारती पवार पिछाडीवर

Dindori Lok Sabha : घरच्याच मतदारांनी नाकारलं; कळवणमध्ये भारती पवार पिछाडीवर

Dindori Lok Sabha Election : दिंडोरी मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. या मतदारसंघात विद्यमान खासदार आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले. दिंडोरी मतदारसंघात यंदा 66.75 टक्के इतकं मतदान झालं होतं. 2019 मधील निवडणुकीत 65.65 टक्के मतदान होतं. म्हणजेच यंदा मतदानात 1.01 टक्का वाढ झाली. मतदानाचा हा वाढलेला टक्का भारती पवारांना झटका देणारा ठरला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे भारती पवारांना त्यांच्या कळवणमध्येच मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे.

कळवण हा स्व. एटी पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार त्यांच्या सून आहेत. पवारांना मानणारे कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने आहेत. या विधानसभा मतदारसंघात डॉ. पवार यांना 56 हजार 461 मते मिळाली. तर त्यांचे विरोधक भास्कर भगरे यांना या मतदारसंघात 1 लाख 14 हजार 134 मते मिळली. म्हणजेच या विधानसभा मतदारसंघात भगरे यांना तब्बल 57 हजार 673 मतांची आघाडी मिळाली.

नांदगाव विधानसभा मतदारसंघात 58.24 टक्के, कळवणमध्ये 70.89 टक्के, चांदवडमध्ये 66.65 टक्के, येवल्यात 65.38 टक्के, निफाडमध्ये 64.31 टक्के तर दिंडोरीत 75.42 टक्के इतकं मतदान झालं. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे भारती पवार यांच्या कळवण तालुक्यात 70.89 टक्के मतदान झालं. मागील वेळी हाच आकडा 72.62 टक्के होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या दिंडोरी मतदारसंघात 75.42 टक्के मतदान झालं. मागील वेळी हा आकडा 69.05 टक्के असा होता. म्हणजेच यंदा मतदानात 5.92 टक्के वाढ झाली. आता हाच वाढलेला टक्का निर्णायक ठरला असे सांगण्यात येत आहे.

Video : भाजपचं बहुमत गाठेल सांगणारे एक्सिस माय इंडियाचे MD लाईव्ह शोमध्ये ढसाढसा रडले

पक्षीय बलाबल पाहिले तर दिंडोरीच्या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व आहे. दिंडोरी पेठ मतदारसंघात अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ आमदार आहेत. तसेच निफाडमध्ये अजित पवार गटाचेच दिलीप बनकर, चांदवडमध्ये भाजपचे डॉ. राहुल आहेर, नांदगावात शिंदे गटाचे सुहास कांदे, कळवण-सुरगणात अजित पवार गटाचे नितीन पवार आणि येवला मतदारसंघात अजित पवार गटाचे छगन भुजबळ आमदार आहेत. म्हणजेच या मतदारसंघात अजित पवार गटाचे चार तर शिंदे गट आणि भाजपाचा प्रत्येकी एक आमदार आहे. महायुतीच्या या आमदारांची ताकद असतानाही भारती पवार पराभूत ठरल्या.

या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत दिंडोरी मतदारसंघ अस्तित्वात आला. आधी मालेगाव मतदारसंघ असताना येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. या मतदारसंघात झागरू मंगळू कहांडोळ यांनी सर्वाधिक वेळा प्रतिनिधीत्व केले. जनता दलाचे हरिभाऊ महाले तीनदा निवडून आले होते. भारतीय जनता पार्टीचे हरिश्चंद्र चव्हाण एक टर्म मालेगावचे आणि दिंडोरी मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर दोन वेळा दिंडोरीचे खासदार राहिले. आता या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व आहे.

Election Result : सहा राज्यांनी घेतली भाजपाची शाळा; राजधानी दिल्लीची ‘वाट’ही केली अवघड

2019 मधील लोकसभा निवडणुकीत एकूण 11 लाख 34 हजार 754 मतदारांनी मतदान केलं होतं. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या डॉ. भारती पवार यांना 5,62,452 तर काँग्रेसचे धनराज महाले यांना 3,68,111 मते मिळाली होती. माकपाच्या जेपी गावितांना 1,94,95 तर वंचितच्या बापू बर्डे यांना 58,847 मते मिळाली होती. या चौरंगी लढतीत भास्कर भगरे विजयी झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube