“एकदा राज्य हातात द्या, मी तुम्हाला शब्द देतो की..” शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

“एकदा राज्य हातात द्या, मी तुम्हाला शब्द देतो की..” शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

Sharad Pawar Speech : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात (Maharashtra Elections) रंग भरू लागला आहे. निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. राजकीय पक्षांनी जागावाटपाच्या चर्चा सुरू केल्या आहेत. मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. जाहीर सभा आणि मेळाव्यांचा धुरळा उडू लागला आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षांचे नेते एकमेकांवर बरसू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथून महायुती सरकारवर हल्लाबोल केला. शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य हातामध्ये द्या. या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.

अखेर भाग्यश्री आत्रामांचा शरद पवार गटात प्रवेश, अहेरीत बाप-लेकीतचं होणार सामना 

शरद पवार म्हणाले, मी दहा वर्षे कृषी खातं सांभाळलं. ज्यावेळी मला कृषी खात्याची जबाबदारी मिळाली त्यावेळी माझ्यासमोर अमेरिकेतून गहू आयातीचा सर्वात मोठा मुद्दा होता. तांदूळ आयातीचाही प्रश्न होताच. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता. आपला देश शेतकऱ्यांचा देश आहे. तरीदेखील गहू तांदूळ विदेशातून आयात करावे लागत होते. या गोष्टींवर आम्ही समाधानी नव्हतो. यामध्ये सुधारणा करण्याची गरज होती.

त्यामुळे मी हे आव्हान स्वीकारलं. गहू आणि तांदळाच्या किंमतीत वाढ केली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कृषी खात्यात मी दहा वर्षे काम केलं आणि 2014 मध्ये मी हा विभाग सोडला. त्यावेळी भारत देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू निर्यातदार देश बनला होता मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटत होता. कृषिमंत्री असताना देशातील शेतकऱ्यांचे 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar NCP : पुण्यात शरद पवारांची जादू? आठ मतदारसंघासाठी तब्बल 41 जण इच्छुक

आज हाच तालुका शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा तालुका आहे. पण या ठिकाणी सुद्धा सत्तेचा दुरुपयोग आणि धमकी सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. तणावाचे प्रकार वाढीस लागले आहेत. लोकांना तुरुंगात टाकले जा आहे. सत्ता मिळाली तर या सत्तेचा दुरुपयोग केला जाऊ लागला आहे. आताही राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती आहे.

आता या लोकांच्या हातून सत्ता हिसकावून महाविकास आघाडीला देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. मी तु्म्हाला शब्द देतो. फक्त एकदा आमच्या हातात सत्ता द्या, या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना केले. या मेळाव्यासाठी श शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube