यशवंत बँकेत 112 कोटींचा घोटाळा! 50 जणांवर गुन्हा दाखल, साताऱ्यात खळबळ

फलटण येथील यशवंत बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

Phalatan Yashwant Bank 112 Crore Scam (1)

Phalatan Yashwant Bank 112 Crore Scam : फलटण येथील प्रसिद्ध यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह एकूण 50 जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राज्यातील सर्वात मोठा बॅंक घोटाळा

या प्रकरणात पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण (Fake Loan Accounts) अहवालानुसार, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत बँकेच्या व्यवहारांमध्ये मोठ्या (Yashwant Bank 112 Crore Scam) प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 या कालावधीत कार्यरत राहिलेल्यांवरही (Satara Crime) अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

संगनमताने निधीचा अपहार

लेखापरीक्षणात उघड झाले आहे की, यशवंत बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष, संचालक आणि काही अधिकाऱ्यांनी परस्पर संगनमताने बँकेचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरला. या काळात त्यांनी बोगस कर्ज प्रकरणे तयार करून खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर केली. कर्ज वितरणासाठी तारण न घेता हेतुपुरस्सर कर्जे दिली. जुनी थकीत खाती बंद दाखवून नवी खाती उघडली आणि त्याद्वारे निधी तृतीय पक्षांकडे वळवला. याशिवाय, दस्तऐवजांमध्ये फेरफार करून आणि खोट्या नोंदी तयार करून निधीचा उद्देशबाह्य वापर केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील आरोपींची यादी

या प्रकरणात माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह तत्कालीन संचालक — नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, महेशकुमार जाधव, अजित निकम, गोपीनाथ कुलकर्णी, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ आदींसह अनेकांची नावे समोर आली आहेत.

त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, तसेच शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे आणि केशव कुलकर्णी यांचाही या गुन्ह्यात समावेश आहे.
शेखर चरेगावकर यांचे नातेवाईक — शार्दूल उर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सूरज गायधनी, विभीषण सोनावणे, दिनेश नवळे यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तब्बल 195 बोगस कर्ज खाती उघडकीस

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, एकूण 195 बोगस कर्ज खाती उघडकीस आली आहेत. अभियुक्तांनी आपली कर्तव्ये पार न पाडता, पदाचा गैरवापर करून ठेवीदार आणि सभासदांच्या हिताला तडा दिला. त्यांनी संगनमताने बँकेचा निधी वळवून मोठा आर्थिक अपहार केला असल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या गंभीर आर्थिक घोटाळ्याची नोंद झाल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस सूत्रांनुसार, आरोपींनी शासकीय नियमांचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
बँकेच्या ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी आणि अपहाराची संपूर्ण साखळी समजून घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेलाही तपासात सामील करण्यात येण्याची शक्यता आहे.

follow us