चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला; पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र
Prithviraj Chavan : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अलीकडेच ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त केला होता. आता त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्यावर जोरदार टीका केली. माजी न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला, अशी टीका चव्हाण यांनी केली.
अचानक मतदान कसं वाढलं? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं खरं कारण
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी निर्णय न घेऊन लोकशाहीचा गळा घोटला. पक्षांतर बंदी कायद्याचा सर्वात मोठा निर्णय होता, पण, त्यांना त्याबाबत निर्णय घेतला नाही, असं चव्हाण म्हणाले. लोकशाहीचा खून झाला तर संविधानाला काही अर्थ उरणार नाही, असेही ते म्हणाले.
पुढं ते म्हणाले, भारतीय लोकशाही बळकट असली पाहिजे, असं सर्वांचं मत आहे. पण, दिवसेंदिवस लोकशाहीला गंभीर धोका निर्माण होतोय. या वर्षाच्या सुरुवातीलाट मोदींनी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचा कायदा बदलला. तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल चव्हाण यांनी व्यक्त केला.
राज्याचे विधानसभा निकाल अनपेक्षित लागले. निकालानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. अनेक जण ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत. या देशात लोकशाही आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि सरकारची असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. सध्या निवडणूक पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पडल्याचा दावा केला जात आहे. पण तरीही लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत साशंकता आहे. त्यामुळे जनता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहे.ईव्हीएम सुरक्षित आहेत, असे आयोगाला वाटत असेल तर सरकार सर्व मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीला किंवा आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक तज्ञांची समिती स्थापन करण्यास का घाबरते? असा सवाल चव्हाण यांनी केला.
लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी 100 टक्क VVPAT ची मोजणी करा. खर्च होईल, काही दिवस लागतील. पण हे करा. तुम्ही जर हे केल नाही तर संशय वाढणार आहे, असंही ते म्हणाले.
मोहन भागवत यांनी तीन मुले जन्माला घाला, असं विधान केलं. त्यावरही चव्हाण यांनी भाष्य केलं. मोहन भागवत, भारतीय जनता पक्ष हे फॅसिस्ट आहेत, हिटलर ही त्यांची प्रेरणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.