गोपीनाथ मुंडे आमच्यासोबत आले असते तर महाराष्ट्रात पुन्हा आमची सत्ता आली असती – पृथ्वीराज चव्हाण

गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असल्याचे सांगत, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे म्हटले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (76)

Prithviraj Chavan’s claim : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून सुरू झालेल्या चर्चेनंतर आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असल्याचे सांगत, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे म्हटले. यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत वापरलेल्या एका शब्दाबद्दलही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना पंकजा मुंडे आणि त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना त्यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी संबंधित एक जुनी आठवण सांगितली होती. त्या काळात सर्व काही व्यवस्थित घडले असते आणि गोपीनाथ मुंडे आमच्यासोबत आले असते, तर 2014 ची विधानसभा निवडणूक आम्ही हरलो नसतो. महाराष्ट्रात पुन्हा आमची सत्ता आली असती, असे चव्हाण यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, 2014 मध्ये आम्ही सत्तेत आलो असतो, तर राष्ट्रवादी काँग्रेसने मला मुख्यमंत्री होऊ दिले नसते. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी मी गोपीनाथ मुंडे यांचे नाव सुचवले असते. या विधानामागे कोणताही राजकीय हेतू नसून ती केवळ त्यांच्या मनातील भावना आणि मुंडे यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्याची भूमिका होती, असे त्यांनी स्पष्ट केले. मी गोपीनाथ मुंडे यांचा अजिबात अवमान केलेला नाही. उलट त्यांचे कार्य, त्यांचा संघर्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही ते म्हणाले.

‘हा देश हिंदू राष्ट्र आहे, कोणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही’; मुंब्र्यातील सभेत नितेश राणेंचे वक्तव्य चर्चेत

दरम्यान, कोल्हापूरमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. नीट परीक्षा प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात बोलताना त्यांनी संसद अधिवेशनातील घडामोडींचा उल्लेख केला. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत उपस्थित राहिले नाहीत. दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह यांच्यावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले, हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना अमित शाह यांच्याबाबत आपण वापरलेला एक शब्द अयोग्य असल्याचे मान्य करत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला त्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करायचा होता. ते गृहमंत्रीपदासाठी योग्य आहेत का, हा मुद्दा मांडायचा होता. मात्र बोलताना माझ्या तोंडून दुसरा शब्द निघाला. त्या शब्दाबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतच्या विधानावरून आणि अमित शाह यांच्यावरील टीकेमुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

follow us