देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच; पक्षफोडीवर राज ठाकरेंचा घणाघात
आमदार सचिन अहिर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाष्य करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले.
Raj Thackeray launches a scathing attack over the splitting of parties : राज्यातील राजकारणात पक्षफोडीचं सत्र सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटातील सहा खासदार आणि विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर भाष्य करत थेट भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले.
मागील आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर काल विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. या सलग घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या परखड शैलीत प्रतिक्रिया दिली. पक्ष फोडण्यापेक्षा पक्ष सोडून जाणाऱ्यांची मानसिकता अधिक चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी सध्याच्या राजकारणावर सडकून टीका केली.
प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला जर कोणी तयार असेल तर गिऱ्हाईक मिळणारच. आज जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत घाणेरडं आहे. अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं. लोकांच्या मनात याबद्दल प्रचंड संताप आहे. यानंतर राज ठाकरे यांनी केंद्रातील नेतृत्वावरही थेट निशाणा साधला. सध्याची संपूर्ण राजकीय समीकरणं एका व्यक्तीभोवती फिरत असल्याचा दावा करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली.
ठाकरेंना आणखी एक धक्का? अहिर यांच्यानंतर आता पुढचा आमदार फोडायचं टार्गेट ठरलं…
पत्त्यांचा बंगला जसा असतो, तसंच हे सरकार आहे. खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे. तो सटकला की संपूर्ण बंगला कोसळेल. जे काही टिकून आहे ते मोदींवर आहे. बाकी कोणावर नाही. या सगळ्यामागे अमित शाह यांचं राजकारण सुरू आहे. राज ठाकरे यांनी भाजपच्या पक्षविस्ताराच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षातील नेत्यांना थेट भाजपमध्ये न घेता त्यांच्याकडून स्वतंत्र गट तयार करून घेण्यामागे भविष्यातील राजकीय गणित असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेचे सहा खासदार फुटले, मग ते भाजपमध्ये का गेले नाहीत? टीएमसीचे २२ खासदार फुटले, त्यांनी वेगळा गट का केला? उद्या पंतप्रधानपदावर दावा सांगायचा झाला तर बाहेरून पाठिंबा मिळावा, यासाठी ही रणनीती आहे. पण विरोधक संपवताना स्वतःच्या घरातच नवे विरोधक तयार होत असतात. बेभान सत्तेमुळे लोकशाहीची मूल्ये धोक्यात येत असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. सत्तेचा अतिरेक कायम टिकत नसतो आणि अशा राजकारणाचे परिणाम भविष्यात सत्ताधाऱ्यांनाही भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यात सुरू असलेल्या पक्षांतरांच्या मालिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांनंतर महायुतीकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.