विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा, ‘या’ दिवशी मिळणार पगार, मंत्री गिरिष महाजनांची मोठी घोषणा

Girish Mahajan : गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. तर आता या आंदोलनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. विनाअनुदनित शिक्षकांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याची घोषणा राज्याचे मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. यामुळे विनाअनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलनस्थळाला भेट देत ही मोठी घोषणा केली आहे.
यावेळी मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, आमची जी भूमिका आहे ती सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामन्य कुटुंबातील आहात. तुमची रोजीरोटी ही आहे. त्यामुळे धाडसी निर्णय फडणवीसांनी घेतला आहे. त्यानुसार 20 टक्के, 40 टक्के त्यानंतर 60 टक्के पगार खात्यात जमा केला जाणार आहे. सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झालेला आहे. मात्र आता तुमचा प्रश्न मार्गी लागला आहे. तुमच्या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं की, आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचाच आहे. पण या दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समाजावून घेऊन 18 जुलैला अधिवेशन संपेल तेव्हा तुमच्या खात्यात पैसे पडलेले असतील आणि यात कोणताही बदल होणार नाही. असं मंत्री गिरिष महाजन म्हणाले.
मोठी बातमी, मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची बदली
तर दुसरीकडे विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी देखील शिक्षकांची भेट घेत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.