“जसं मांजरी पिल्लांना खाते, तसं राजू शेट्टी कार्यकर्त्यांना खातात! तुपकरांच्या नाराजीवरुन सदाभाऊ खोतांची टीका

“जसं मांजरी पिल्लांना खाते, तसं राजू शेट्टी कार्यकर्त्यांना खातात! तुपकरांच्या नाराजीवरुन सदाभाऊ खोतांची टीका

मुंबई : “जसं मांजरीनं स्वतःची पिल्ल खाती तसं राजू शेट्टी हा मांजरीची जात आहे. तो स्वतःची पिल्ल खातो. कार्यकर्ता मोठा नाही झाला पाहिजे, कार्यकर्त्याला काही मिळालं नाही पाहिजे, अशी भावना या माणसाच्या मनात असते”, असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यावर निशाणा साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी अनेकदा माध्यमांसमोरही उघड केली आहे. याचवरुन सदाभाऊ खोत बोलत होते. (Sadabhau khot criticized raju shetty on ravikant tupkar issue)

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ही नावांची यादी मोठी आहे. यात रविकांत तुपकर हा धडाडीचा, तरुण कार्यकर्ता आहे. विदर्भामघ्ये त्याने स्वाभिमानीचा झेंडा खंद्यावर घेऊन 20 वर्षांपासून काम करत आहे. पायाला भिंगरी बांधून त्याने संघटना वाढविण्याचे काम केले. पण राजू शेट्टी हा बहुजन समाजातील एखादा चेहरा बरोबरीला यायला लागला, मोठा व्हायला लागला, शेतकरी त्याला खंद्यावर घ्यायला लागले की त्याला पायाखाली तुडवायच कसं याचा विचार करत असतात. यात मग आम्ही आणलेले, रविकांत तुपकरांनी आणलेले कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समोरच्याची शिकार करायची.

जसं मांजरी स्वतःची पिल्ल खाती तसं राजू शेट्टी हा मांजरीची जात आहे. तो स्वतःची पिल्ल खातो. कार्यकर्ता मोठा नाही झाला पाहिजे, कार्यकर्त्याला काही मिळालं नाही पाहिजे, अशी भावना या माणसाच्या मनात असते. मी आमदार झालो, मंत्री झालो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला लागलो, तेव्हा त्यांना वाटायला लागलं की सदाभाऊ खोत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सर्वेसर्वा होतो की काय. पण मी तेव्हाही सांगितलं होतं की संघटनेचे अध्यक्ष तुम्ही, आमचे नेतेही तुम्हीच. पण माझ्यासोबतही असाच प्रकार झाला. एक तर कोणत्याच पक्षासोबत सोयरीक टिकवायची नाही, स्वतःचा स्वार्थ साधत असेल तर सोयरीक करायची. पण कार्यकर्त्याला एखादे पद मिळणार असले, कार्यकर्ता मोठा होणार असेल तर त्याला तत्वांचा मुलामा द्यायचा असा प्रकार आहे.

त्यामुळे मी यापूर्वी त्यांच्याबद्दल काही बोलत नव्हतो पण जीवापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे हातपाय तोडत असेल तर मन पेटून उठतं. जर एका वाक्यात राजू शेट्टींचं वर्णन करायचे असेल तर तो बदमाश माणूस आहे. बदमाश माणूस चांगल्या माणसाची कदर करत नसतो. माझी आणि रविकांतची मागील काळात भेट झाली नसेल तरीही चळवळीचा माणूस राजकारणात आला पाहिजे, सत्ताकारणात आला पाहिजे. त्याशिवाय गावगाड्याचे प्रश्न सुटणार नाहीत. पण राजू शेट्टीचं तसं नाही, गावगाड्यातील प्रश्नांचे आणि कार्यकर्त्यांची माती झाली पाहिजे आणि माझं तेवढं सोन झालं पाहिजे, असा तो माणूस आहे, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube