‘धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं’; राऊतांकडून अजितदादांचा जाहीर पाणउतारा
Sanjay Raut On Ajit Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी राऊतांच्या थूंकण्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, असे अजितदादा म्हणाले होते. यावर आता राऊतांनी अजितदादांना जोरदार उत्तर दिले आहे.
धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असे म्हणत त्यांनी अजितदादांना डिवचले आहे. तसंच ज्याचं जळतं त्याला कळतं असे त्यांनी अजितदादांना सुनावले आहे. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपसारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असं म्हणत त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा आहे. आपला काही इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि काम करु शकतो ते देशाला दाखवून दिलं आहे. मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की, ते म्हणाले की मला काहीतरी त्रास होत होता म्हणून तसं केलं. माझा त्यामागचा हेतू तो नव्हता असंही त्यांनी म्हटलं. पण प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना थूंकले होते. त्यांना शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यानंतरदेखील ते थुंकले. त्यामुळे आता संजय राऊतांवर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे.