जरांगेंना भेटा, चर्चा करा! संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ‘आंदोलनाची चेष्टा…’

Sanjay Raut On Devendra Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) जोरदार टीका केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत यांनी फडणवीस यांनी तातडीने जरांगेंची भेट घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला.
राऊत म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Politics) आहे. आपल्या न्यायासाठी मराठा समाज दूरदूरून मुंबईत दाखल झाला आहे. त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणे हे राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्री यांचं कर्तव्य आहे. जर कोणी जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाच्या खांद्यावर राजकारण करत असेल तर मुख्यमंत्री म्हणून लोकांसमोर प्रामाणिकपणे सांगा.
या प्रश्नाचा तोडगा
ते पुढे म्हणाले की, आजवर जेव्हा जेव्हा आपण सत्तेत आला आहात, तेव्हा या प्रश्नांचा वापर करूनच राजकारण केलं आहे. जर सरकारला खरंच या प्रश्नाचा तोडगा काढायचा होता, तर फडणवीस यांनी मनोज जरांगे यांची मराठवाड्यात भेट घेऊन ठोस प्रस्ताव मांडायला हवा होता. पण तसं न केल्यामुळे आज हे वादळ मुंबईत आलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनामुळे गोंधळ होईल का, या प्रश्नावर राऊत म्हणाले की, मला विश्वास आहे की आमचे बांधव गणेशोत्सव डिस्टर्ब करणार नाहीत. पण जर सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर परिस्थिती चिघळू शकते. कारण मनोज जरांगे दबावाखाली येणारे नेते नाहीत. त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे, त्यामुळे सरकारने संयमाने चर्चा करून या मागण्यांचा विचार करणे गरजेचे आहे.
“बाळासाहेब थोरातांची दहशत मोडून काढणार”, अमोल खताळांवरील हल्ल्यानंतर मंत्री विखे संतापले
महाराष्ट्रात आग लावण्याचा प्रयत्न
फडणवीसांवर आरोप करताना राऊत म्हणाले की, तुम्ही ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करून निधी दिला, पण मराठा समाज आज रस्त्यावर आहे. त्यामुळे लोक नाराज आहेत. महाराष्ट्राचे नेतेपद हे सर्व जातींना समान हक्क देण्यात आहे. जातीय राजकारण करून महाराष्ट्रात आग लावण्याचा प्रयत्न चाललाय, याची जबाबदारी फडणवीस यांचीच आहे. सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असूनही निर्णय होत नसल्याची टीका करत राऊत म्हणाले की, लोक मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांकडे अपेक्षेने पाहत आहेत. पण त्यांनी जरांगेंना भेटून तोडगा काढला नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. पूर्वी सेनापती बापट, अण्णा हजारे यांच्यासारख्या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्री भेट घेत असत. मग जरांगेंची भेट घेण्यात काय अडचण आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेची भूमिका काय?
आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, शिवसेनेची कायम भूमिका आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कोणत्याही समाजातील असो, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मराठा समाजात अशा कुटुंबांची संख्या मोठी आहे, त्यांच्या शिक्षण-नोकरीचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची चेष्टा होऊ नये.