रुतलेली चाकं पळाली! नऊ वर्षांत पहिल्यांदाच एसटी बस सुसाट, ऑगस्टमध्ये 16 कोटींपेक्षा अधिक नफा
ST Bus : मागील अनेक वर्षांपासून एसटीची चाकं रुतलेली असल्याचं दिसून येत होतं. कोरोना काळानंतर एसटी (ST Bus) चांगलीच तोट्यात असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर आता यंदाच्या उत्सवांमध्ये प्रवाशांनी एसटीच्या चाकांना बळ दिल्याने ऑगस्ट महिन्यात एसटीचे 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये नफा झाला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिलीयं. यासंदर्भाती एक प्रसिद्धीपत्रकच जारी करण्यात आले आहे.
नऊ वर्षांनंतर एसटी महामंडळ पहिल्यांदा माहे ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये फायद्यात आले आ.. या बद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..! pic.twitter.com/QFfXiwIZru
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) September 12, 2024
अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात होतं. अखेरीस 2015 साली एसटी फायद्यात आली होती खरी पण त्यानंतर कोरोना काळ अत्यंत वाईट गेल्याचं दिसून आलं. त्यातच महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने एसटी महामंडळ अजूनच तोट्यात गेलं होतं. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आणि महिलांसाठी अर्धे तिकीट आकारण्यात आलं. त्यानंतर रुतलेली एसटीची चाके पुन्हा रुळावर येत असल्याचं दिसून आलंय.
दरम्यान, एसटी गणपती स्पेशल गाड्यांमुळे दोन लाख चाकरमानी यंदा कोकणात रवाना झाले. त्यानंतर आता परतीच्या प्रवास देखील एसटीला नव्या शिखरावर पोहचविणार आहे. एसटी आता साध्या टु बाय टु आसनाच्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या बसेस देखील टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहेत. या बसेस लांबपल्ल्याच्या मार्गासाठी उत्तम ठरणार आहेत. त्यामुळे एसटी उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.