जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान; संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी दगडफेक अन् जाळपोळ

  • Written By: Published:
जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान; संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी दगडफेक अन् जाळपोळ

Jayashree Thorat : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत भाजपच्या एका वक्त्याने जयश्री थोरात (jayashree Thorat) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे काँग्रेस पक्षातून तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. (Sujay Vikhe) या विधानामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या तर काही ठिकाणी गाड्यांना आग देखील लावण्यात आली.

सदर घटनेनंतर रात्री दहाच्या सुमारास जयश्री थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. तब्बल 7 तास हे आंदोलन सुरू असून पहाटे पाच पर्यंत दोन फिर्यादी दाखल करण्यात आलं असून तिसरी फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

बापाविषयी बोलाल तर! तुम्ही वडिलांकडून धडे घ्या; विखेंचा थोरातांना खोचक सल्ला

या घटनेनंतर धांदरफळ गावांमधील अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सभास्थळी धाव घेतली. सुजय विखेही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप या वेळी महिलांनी केला. याप्रसंगी विखे यांनी भाषण आटोपते घेतले. तसंच, देशमुख यांनाही भाषण संपवण्यास सांगितलं. सर्वत्र गंभीर वातावरण झाले असताना सभा संपवून तातडीने निघत असताना महिलांनी सुजय विखे आणि देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोंधळ उडाला.

सुजय विखे काय म्हणाले?

सदर घटनेनंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर सुजय विखे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त वक्तव्याचा सुजय विखे यांनीही निषेध केलाय. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलंय. मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी देखील सुजय विखे यांनी केली. तसंच, आमच्याबद्दल चुकीच वक्तव्य केलं, तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube