“संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात नंतर..”, संघाचं कौतुक करताना शिंदेंच्या तोंडी जुन्या आठवणी

“संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात नंतर..”, संघाचं कौतुक करताना शिंदेंच्या तोंडी जुन्या आठवणी

Eknath Shinde on RSS : नागपुरात राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी महायुतीच्या आमदारांनी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात (RSS) हजेरी लावली. प्रथेप्रमाणे संघाने महायुतीच्या आमदारांना सकाळी ८ वाजता संघ मुख्यालयात आमंत्रित केलं होतं. यावेळी उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर (Eknath Shinde) होते मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली असं सांगायलाही शिंदे विसरले नाहीत.

नागपूर मेट्रो प्रकल्पाला मिळणार चालना; आशियाई विकास बँक करणार 1527 कोटींचे अर्थसहाय्य

विधीमंडळ अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी महायुतीच्या आमदारांनी संघाच्या कार्यालयात हजेरी लावली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, रेशीमबागेत मी काही पहिल्यांदा आलेलो नाही. याआधी देखील आलो आहे. संघ आणि संघ परिवाराशी माझं नातं लहानपणापासूनचं आहे. संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात झाली. नंतर शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना. बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघेंची शिकवण हे सारं सुरू झालं असे शिंदे म्हणाले.

संघाची शिकवण जोडणारी तोडणारी नाही

शिवसेना आणि संघाचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेनं काम कसं करावं हे संघाकडून शिकलं पाहिजे. संघाचा स्वयंसेवक नेहमीच कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करत असतो. आज विचार केला तर संपूर्ण देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच लाख शाखा भरतात असही एकनाथ शिंदे म्हणाले. पुढील वर्षात संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाचं योगदान कुणालाच नाकारता येणार नाही. संघाची शिकवण ही जोडणारी आहे तोडणारी नाही असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे अजूनही नाराज.., मंत्रिमंडळात सहभागी होणार का?, फडणवीस म्हणाले..

फडणवीसं मुख्यमंत्री झाल्याचा आनंदच

यानंतर एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केलं. निवडणुका झाल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरली होती. शिंदे नाराज झाल्याच्या बातम्याही त्या काळात आल्या होत्या. परंतु, भाजपकडून मुख्यमंत्रिपद कोणत्याही परिस्थितीत मिळणार नसल्याची जाणीव झाल्याने त्यांनी गृहमंत्रिपदासाठी दबाव वाढवला होता. आता गृहमंत्रिपदही शिंदेंना मिळण्याची फारशी शक्यता नाही. त्याऐवजी नगरविकास खाते मिळू  शकते असे सांगितले जात आहे.

या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा आनंदच आहे. फडणवीसही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. राज्याचं मुख्यमंत्रिपद त्यांना पुन्हा मिळालं याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. सहकाऱ्यांनाही आहे असे शिंदे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube