सहा महिन्यांपासून ‘प्लॅनिंग’ : प्रॉपर्टीसाठी सुनेनं काढला सासऱ्याचा काटा; पॉलिटिकल कनेक्शनचाही संशय

सहा महिन्यांपासून ‘प्लॅनिंग’ : प्रॉपर्टीसाठी सुनेनं काढला सासऱ्याचा काटा; पॉलिटिकल कनेक्शनचाही संशय

22 मे 2024 ची सकाळ… नागपूरकरांनी नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात केली होती. प्रत्येक जण काही तरी कामात, कुठे तरी जाण्यात व्यस्त होता. अशात बालाजीनगर परिसरातील दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाणाऱ्या 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका गाडीने उडवले. ही धडक एवढी जोरात होती की त्यात पुरुषोत्तम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी पुण्यातील ‘पोर्श’ कार अपघाताचे प्रकरण ताजे असल्याने इथेही सुरुवातीला पोलिसांसह सर्वांनाच हा हिट अँड रनचा प्रकार वाटला. पोलिसांनीही त्याचदृष्टीने तपास सुरु केला… पण.. पण तपासात अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारी माहिती समोर आली. प्रॉपर्टीसाठी सुनेनेच हे सगळे प्लॅनिंग केल्याचे समोर आले. सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकली.

नेमकं काय घडलं होतं यात आणि पोलिसांनी या अपघाताच्या दिसणाऱ्या प्रकरणात घातपाताचा कसा भांडाफोड केला तेच आपण समजून घेऊ…

सुरुवातीला आपण मृत पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊ. 82 वर्षांचे पुरुषोत्तम पुट्टेवार आणि शकुंतला हे दोघे पती-पत्नी. या दोघांना दोन मुले. एक डॉ. मनीष आणि दुसरी योगिता. डॉ. मनिष हे अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये कान, नाक, घसा तज्ज्ञ आहेत. मनिष यांचा विवाह सरकारी अधिकारी असणाऱ्या अर्चना यांच्याशी झाला आहे. अर्चना या सध्या गडचिरोली येथे नगररचना विभागाची सहायक संचालक आहेत.

याच अर्चना यांना दोन भाऊ आणि एक बहिण. एक प्रशांत पार्लेवार आणि दुसरे प्रवीण पार्लेवार. या घटनेतील मृत पुरुषोत्तम पुट्टेवार यांची मुलगी योगिता हिचा प्रवीण पार्लेवार यांच्याशी विवाह झाला होता. म्हणजे पार्लेवार यांची अर्चना पट्टेवारांची सून तर पट्टेवार यांची योगिता पार्लेवार यांची सून. थोडक्यात योगिता ही अर्चना हिची नणंदही आणि वहिनीही आहे.

कुटूंबानंतर येऊ कौटुंबिक कलहाकडे.

पार्लेवार कुटुंबाचे उंटखाना परिसरात सहा हजार चौरस फूट जागेवर घर आहे. या जागेवर अर्चना आणि तिचा भाऊ प्रशांतला मॉल बांधायचा होता. याच जागेत आपल्यालाही वाटा मिळावा अशी अर्चनाची वहिनी म्हणजे योगिता पार्लेवार हिची इच्छा होती. यासाठी योगिता यांनी न्यायालयात खटलाही दाखल केला. मात्र हा खटला दाखल करण्यामागचा ब्रेन हा योगिता यांचे वडील आणि मृत पुरुषोत्तम यांचा असल्याचा दाट संशय अर्चना आणि प्रशांत यांना होता. अशात अर्चना यांचे पती डॉ. मनिष हेही वडील आणि बहिणीच्याच बाजूने उभे राहिले. शिवाय पुरुषोत्तम हे त्यांची सगळी संपत्ती योगिताच्या नावे करणार अशीही भिती अर्चना यांच्या मनात होती. याच संतापातून अर्चना आणि प्रशांत यांनी सहा महिन्यांपूर्वी हा ब्रेनच संपण्याचा कट रचला.

मला खासदार व्हायचंय हे नक्की पण, माझ्यावर अन्याय झाला का? हे अजितदादाच सांगतील

अर्चनाने यासाठी हाताशी धरले ते नवरा डॉ. मनिषचा ड्रायव्हर सार्थक बागडे याला. या सार्थकला काही दिवसांपूर्वीच अर्चना यानेच कामावर ठेवले होते. अर्चनाने त्याला एक कोटी रुपयांची सुपारी दिली. सोबतच बारसाठी जागा आणि बारचे लायसन्स देण्याचे आमिषही अर्चनाने सार्थकला दिले. यानंतर सार्थकने नीरज निमजे, सचिन धार्मिक यांना हाताशी घेतले. अर्चनाच्या सूचनेवरून सार्थकने याआधाही पुरुषोत्तम पुट्टेवार यांना दोनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी ते वाचले होते. त्यामुळे यावेळी कोणतीही चूक नको होती. त्यासाठी या तिघांनी एक लाख 60 हजार रुपयांची एक सेकंड हॅन्ड कार विकत घेतली. सगळा प्लॅन ठरला.

पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या पत्नी शकुंतला यांच्यावर आठ मे रोजी एक शस्त्रक्रिया झाली. घरी काळजी घेण्यासाठी कोणी नसल्याने मनीष यांनी शकुंतला यांची घरच्याच क्लिनिकमधील एका खोलीत व्यवस्था केली. पुरुषोत्तमही तिथेचे राहायचे. ते सकाळी अंघोळीला मुलीकडे जायचे. 22 मे रोजी ते सकाळी नेहमीप्रमाणे दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी निघाले. त्याचवेळी सचिन हा पुरुषोत्तम यांचा पाठलाग करत होता. त्याने गाडीत बसलेल्या सार्थक आणि नीरज यांना इशारा केला. दोघांनी भरधाव कार चालवून पुरुषोत्तम यांना उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला.

टार्गेट पूर्ण होईपर्यंत ना वॉशरूम ना पाणी प्यायचे; ॲमेझॉनमध्ये कर्मचाऱ्यांना घ्यायला लावली अजब शपथ

पोलिसांनाही सुरुवातीला हे हिट अँड रनचे प्रकरण वाटले. पण घरच्या लोकांना पहिल्या दिवसापासूनच हा घातपात असावा असा संशय होता. घरच्यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे ही ‘सुपारी किलिंग’ असल्याची तक्रारही केली. पोलिसांनीही मग त्यादृष्टीने तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या आधारे सचिनला अटक झाली. त्यानंतर नीरजला ताब्यात घेतले. हा नीरज तर कधी कोणाला साधा चहाही पाजायचा नाही. सतत इतरांकडून पैसे उसने घेणार. पण त्या घटनेनंतर त्याचे वागणेच बदलले. निरज अचानक पैसे उधळू लागला. मित्रांना दारु पार्ट्या देऊ लागला. त्यामुळे काहींना त्याच्यावर संशय आला. पुढे सार्थकला अटक केली.

सार्थकला अटक केल्यानंतर या प्रकरणाने गती पकडली. अर्चना, प्रशांत यांना अटक झाली. अर्चनाची स्वीय सहायक पायल नागेश्वर हिलाही ताब्यात घेण्यात आले. पायलचा या प्रकरणात नेमका कसा सहभाग होता हे अजून समोर आलेलं नाही. याशिवाय या प्रकणात आता दबक्या आवाजात एका राजकीय नेत्याचाही सहभाग असल्याचे बोलले जाते. या नेत्याला गडचिरोलीतील कोळसा पट्टा हवा होता. तर अर्चनाला प्रमोशनसह चांगल्या जागी बदली हवी होती. आता या चर्चा किती खऱ्या किती खोट्या हे तपासात समोर येईल. पण तुर्तास तरी अर्चना आणि प्रशांत यांनी प्रॉपर्टीसाठी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा जीव घेतला ही पोलीस तपासात समोर आलेली वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube