माझे आमदार निवडून द्या, मग दाखवतो कामाचा तडाखा; अजित पवारांचा शब्द
Ajit Pawar News : माझे आमदार निवडून द्या, मग दाखवतो कामाचा तडाखा, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनतेला संबोधित करताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कागलमध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यात अनेक पक्षांची सत्ता येत असते जात असते, पण सत्तेचं ताम्रपत्र कुणीच घेऊन आलेलं नाही. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न जनतेसमोर असतात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षात बसून जमत नसतं. त्यासाठी सत्ताधारी पक्षात जावं लागतं. आमच्यासमोर अनेक प्रश्नांना अडचणी यायच्या, त्यामुळेच आम्ही सत्तेत गेलो आहोत. तुम्ही आपले आमदार निवडून द्या, मग मी कामाचा तडाखाच दाखवतो, असा शब्दच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
तसेच तुम्ही आपलं सरकार आणा, आमदार निवडून आणा, आपलं सरकार आल्यावर कामाचा तडाखा दाखवतो. अर्थ विभागाकडून मी निधी कमी देत नाही. आठवड्यातून एक दिवस मी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी येणार आहे. कागलमध्येही असणार आहेत, पण कार्यकर्त्यांनी आम्हाला सत्तेत जाण्याची भूमिका का घ्यावी लागली आहे. सर्वच मतदारांना पटवून दिलं पाहिजे, असा कानमंत्रच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
कोल्हापुर जिल्ह्यात रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, रुग्णालये, इंजिनिअरिंग कॉलेज, वैद्यकीय कॉलेज, रोजगार, यासाठी करोडो रुपये लागतात, त्यासाठी मी निधी उपलब्ध करुन देणार, जिल्ह्यासह राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायम राहणार असल्याचं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अजित पवार गटाकडूनही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणाचं पारडं जड असणार हे आता पुढील निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.