‘त्या’ पेपरवर एक नंबरला आव्हाडांची सही, यालाच सगळं कळतं का? एकेरीवर येत मुश्रीफांनी फटकारलं
Hasan Mushrif Criticized Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भाजप आणि शरद पवार गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. काही दिवसांपासून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचं नाव घेत टीका केली होती. जेव्हा भाजपसोबत जाण्याचा हे विचार करत होते तेव्हा मुश्रीफांनी सगळ्यात आधी मला कॉल केला होता, असा दावा आव्हाड यांनी केला होता.
मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आव्हाड यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आव्हाडांचा थेट एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. मुश्रीफ म्हणाले, आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भाजप आणि शिंदेंसोबत जावं यासाठी जितेंद्र आव्हाड यांनीच पुढाकार घेतला होता. आमदारांनी सह्या केल्या त्या पेपरवर आव्हाड यांची सही एक नंबरला होती. आम्ही भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा आव्हाड आमच्यासोबत नव्हते. माझा जर भाजपसोबत जाण्याला विरोध असता तर मी मंत्रिपदाची शपथ घेतली असती का? यांनाच सगळं कळतंय का. जितेंद्र आव्हाडांना पक्षात कुणीही विचारत नाही. ते एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत आहेत, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड ?
ज्यावेळी भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी सर्वात आधी मला मुश्रीफांचा फोन आला होता. काही करून हे थांबवलं पाहिजे असं मुश्रीफ मला म्हणाले. मी आतापर्यंत मुश्रीफ यांच्याबरोबर दहा मिनिटं सुद्धा बोललो नाही. बोललो असेल तर त्यांनी सांगावं. हसन मुश्रीफ यांनाच विचारा कोणत्या तीन पक्षांत भांडणं लावण्याचं काम केलं, असे आव्हाड म्हणाले होते. याआधीही आव्हाड यांनी मुश्रीफांवर जहरी टीका केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांतील शाब्दिक वाद वाढतच चालला आहे. आता मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेवर आव्हाड काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.