“फडणवीस साहेब, तुमच्यासाठी ‘एक’ कडू गोळी ‘रोज’ गिळतोय” : रणजीतसिंहांनी खदखद बोलून दाखविली!

“फडणवीस साहेब, तुमच्यासाठी ‘एक’ कडू गोळी ‘रोज’ गिळतोय” : रणजीतसिंहांनी खदखद बोलून दाखविली!

फलटण : भविष्यात माढा लोकसभा (Madha) मतदारसंघासाठी काही कठोर निर्णय घ्यायची वेळ आल्यास नक्की घ्या, हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) तुमच्या पाठीशी उभा आहे. या फलटण (Phaltan) तालुक्यातून तुम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला 70 हजारांचे लीड देऊ, तुम्ही जो दगड उभा कराल त्याला शेंदूर फासण्याचे काम करु. अशा कितीही कडू गोळ्या गिळण्याची तयारी आहे. आजसुद्धा तुमच्यासाठी एक कडू गोळी गिळतोय, असे म्हणत नाव न घेता माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्याविषयीची खदखद बोलून दाखविली.

आज (17 जानेवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निरा देवधरच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच विविध विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर बोलत होते. (Madha MP Ranjitsinh Naik Nimbalkar attacked NCP (Ajit Pawar group) MLA Ramraje Naik Nimbalkar)

‘…म्हणजे राज कुंद्राने ब्लू फिल्म बनवल्यासारखंच’; राऊतांच्या टीकेवर नितेश राणेंचा पलटवार

यावेळी ते म्हणाले, जे शब्द आम्ही मागितले होते ते तुम्ही पूर्ण केले आहेत. त्यामुळे भविष्यात ज्या दगडाला कुंकू लावाल त्याचा आम्ही गणपती म्हणून स्वीकार करु.  भविष्यामध्ये कोणताही स्वार्थ न ठेवता त्याच्यासोबत ताकदीने उभे राहु. आज तमाम फलटणकरांच्या साक्षीने सांगतो की तुम्ही भविष्यामध्ये कोणाचाही निर्णय घ्या. रणजीतसिंह नाईक निंबाळकर शब्द देतो की उद्याच्या भविष्यामध्ये कोणताही कठोर निर्णय घेतला तरी या फटलण तालुक्यामधून तुम्हाला किमान 70 हजारांचे लीड दिल्याशिवाय राहणार नाही.

लोकांना वाटत होते की ही लोकसभेची सभा आहे, पण ही लोकसभेची नाही तर वचनपूर्तीची सभा आहे. दिलेले शब्द तुम्ही पूर्ण केले. तुमचे आभार मानण्याची ही सभा आहे. म्हणून या लोकांच्या साक्षीने शब्द देतो आहे. येणाऱ्या भविष्यात तुम्ही जो काही कडू निर्णय घ्याल त्या सगळ्या कडू गोळ्या गिळण्याची आमची ताकद आहे. आज सुद्धा एक कडू गोळी गिळत आहे. पण अशा अनेक गोळ्या आम्ही तुमच्या प्रेमापुढे गिळणार आहे, असे म्हणत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना टोला लगावला.

‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट

रामराजे-रणजीतसिंह वैर :

रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. दोघांचे अर्धा टक्काही जमत नाही. रणजितसिंह आधी काँग्रेसमध्ये होते, तर रामराजे राष्ट्रवादीमध्ये. मात्र तरीही दोघांमधून विस्तवही जात नव्हता. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या तीन पिढ्या माझ्यावर आरोप करत आल्या आहेत. रणजीतसिंहांनी मला खूप त्रास दिला आहे, असे आरोप रामराजे जाहिररित्या आजही करतात. अशात रामराजे निंबाळकरांनी अजितदादांसोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपच्या पंगतीत येऊन बसले. त्याच पार्श्वभूमीवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी ही टीका केल्याचे बोलले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube