Karjat Market Committee : कर्जत बाजार समितीत आणखी ट्विस्ट, दोन जागांसाठी फेरमतमोजणी
Recounting of two seats of Karjat Bazar Samiti Seva Society will be held : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Agricultural Produce Market Committee) तक्रार केलेल्या दोन जागांच्या फेरमतमोजणीचा (recount) आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी (Ganesh Puri) यांनी सोमवारी मान्य केला. २२ मे रोजी ही मतमोजणी होणार आहे. भाजपच्या उमेदवार लीलावती जामदार (Lilavati Jamdar) आणि भरत पावणे (Bharat Pawane) यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी २९ एप्रिलला झाली. आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला समसमान जागा मिळाल्या होत्या. यामध्ये भाजपच्या सेवा सोसायटी महिला राखीव मतदारसंघाच्या उमेदवार लीलावती जामदार आणि सर्वसाधारण सेवा सोसायटीचे दुसरे उमेदवार भरत पावणे यांनी मतमोजणीवर हरकत घेतली होती. दोन्ही उमेदवारांना अवघ्या दोन ते तीन मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
New Zealand Hostel Fire : न्यूझीलंडमध्ये वसतिगृहाला भीषण आग, 10 जणांचा मृत्यू
मात्र आपणास विजयाचा ठाम विश्वास असून मतमोजणी सदोष झाली असल्याचे लेखी पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांना भरत पावणे आणि लीलावती जामदार यांनी तत्काळ दिला होता. परंतु, सूर्यवंशी यांनी मतमोजणी नियुक्त प्रतिनिधींसमोरच झाली असून ती बरोबर आहे, असे म्हणणे सादर करीत फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळून लावला होता. यावर पावणे आणि जामदार या दोन्ही उमेदवारांनी न्यायालयाचे दार ठोठावत जिल्हा उपनिबंधकाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती. यावर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सर्व बाजू ऐकत सोमवारी (दि. १५) जामदार आणि पावणे यांचा युक्तिवाद मान्य करीत २२ मे रोजी दोन्ही मतदारसंघांची फेरमतमोजणी करून योग्य तो निकाल जाहीर करण्याचा निर्णय दिला. त्यामुळं आता या फेर मतमोजणीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अर्जदारांच्या वतीने अॅड. बी. सी. शेळके, अॅड. गजेंद्र पिसाळ, अॅड. अच्युत भिसे, विशाल पांडुळे यांनी काम पाहिले. तर प्रतिवादींच्या वतीने अॅड. शरद जाधव यांनी काम पाहिले.
दरम्यान, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला समसमान ९- ९ जागा मिळाल्या आहेत. मात्र फेरमतमोजणीनंतर यात बदल घडेल का? याकडे मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण दोन्ही आमदारांनी ही बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. फेरमतमोजणीनंतर सभापती- उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.