भाजप अन् शिंदेंकडून मुंबईसाठी खोट्या घोषणा; पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंकडून चिरफाड

होर्डिंग लावलेत पागडीमुक्त मुंबई. त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 15T153327.771

शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या घोषणांची चिरफाड केली. ‘पागडीमुक्त मुंबई’ शिंधे आणि भाजप बोलत असले तरी ही फसवी घोषणा आहे, बळी पडू नका. तसंच, जे सत्य आहे ते जाणून घ्या. त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी शिंधे-भाजप सरकारवर थेट वार केले आहेत.

निवडणूक आयोगाने दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आणि कदाचित २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होईल, असा अंदाज आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर ड्राफ्ट रोल्सवर आम्ही लाखोमध्ये आक्षेप घेतले होते त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाहीये. साडेबारापर्यंत त्यांच्या निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाहीये. म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण? असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

ज्या या शासनाने फसव्या घोषणा केलेल्या आहेत. कारण भाजपला जुनी सवय आहे खोटं बोलण्याची. भाजपच्या राजवटीलाही अशा घोषणांची जुनी सवय आहे. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देऊ हे सांगितलं होतं अजून तेही झालेलं नाहीये. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू हे सांगितलं होतं. गेलं वर्ष आपण पाहिलं की शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. पण कुठंही कर्जमुक्ती तर नाहीच पण मदत देखील पोहोचलेली नाही. आणि अशा वातावरणात २९ शहरं महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत असंही ते म्हणाले.

एकतर विरोधी पक्षनेतेपद द्या; नाहीतर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा; उद्धव ठाकरे यांची कायदेशीर मागणी

ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची धावपळ झाली. आणि थातूरमातूर उत्तर त्यांनी दिलं होतं. आज त्यांच्या सगळ्या घोषणा एक्स्पोज करत आहे आणि त्यांची चिरफाड करत आहे. आणि या घोषणा या फसव्या आहेत. भाजप खोटं बोलत आहे, याला बळी पडू नका, फसून जाऊ नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर पहिली घोषणा म्हणजे, आपण सगळीकडं पाहत असाल होर्डिंग्स लागलेत. एक पक्ष ज्या माणसाने चोरला त्यांचे की पागडीमुक्त मुंबई करणार. तसंच, पाहिलं तर पागडी हा विषय महाविकास आघाडीचं म्हणजे उद्धवसाहेबांच्या सरकारने सोडवला होता ७९ अ, ७९ ब अनुच्छेद आणून.

जर उपकरप्राप्त इमारत मोडकळीस आलेली असेल तर त्याला पहिले सहा महिने जागा मालकाला आणि नंतरचे टेनेंन्टसा देऊन तिकडचा पुनर्विकास शक्य करत होतो. हे राष्ट्रपतींकडे गेलं मग २०२२ ला स्वाक्षही होऊन आलं. अनेक ठिकाणचे पुनर्विकास हे मार्गी लागत असताना काहीकाही ठिकाणी एनओसी मिळाल्यानंतर कोणीतरी कोर्टात गेलं आणि तिथे एक तांत्रिक तिढा बसलेला आहे. आम्ही मागणी करत होतो की या पागडी इमारतींना, सेसच्या इमारतींना, उपकरप्राप्त इमारतींना तुम्ही न्याय दिला पाहिजे. आमच्या मागण्या या स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या या पागडीमधल्या टेनंट्सच्या आहेत. पहिलं म्हणजे सगळ्या टेनंट्सना तुम्ही तांत्रिक आणि लीगल संरक्षण द्या, ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा. कारण आता असं झालंय कुठेतरी बिल्डींग मोडकळीस आलेली दाखवून जे जागा मालक आहेत ते पागडीमध्ये राहणाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला.

हा जो तिढा निर्माण झालेला आहे की सक्षम प्राधिकरण कोणा आहे? हा लवकर सोडवा कोर्टात तुमचा इगो बाजूला ठेवा. आणि सांगा कोर्टासमोर की म्हाडाच हे सक्षम प्राधिकरण आहे. का अजून आडलंय, का राज्य सरकारने पुढे कार्यवाही केली नाही हे कोणास ठाऊक? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्टी जी मी अधिवेशनात मागणी केली होती ती हीच होती की, ज्या काही उपकरप्राप्त इमारती, सेस किंवा पागडीवाल्या प्रॉपर्टी असतील यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की बिल्डींग मोडकळीस आली असेल किंवा नसेल पण ६० वर्षांची बिल्डींग झाली की पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या टेनंट्सना हे तुम्ही शक्य करून द्या. पण झालं असं हे सगळं न होता गृहनिर्माण मंत्र्यांनी जी काही घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती असंही ते म्हणाले.

त्याच कारणामुळं ते होर्डिंग लावलेत पागडीमुक्त मुंबई. त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं. किंवा मग ते अदानीचं कसं धारावीतली लोकं देवनार डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं तसं तिथे देवनार डम्पिंग ग्राउंटवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंधेचा असू शकतो. फेकनाथ मिंधे एवढ्यासाठी बोलतोय की सगळ्या गोष्टी फेक आहेतच पण ही त्यांची घोषणा देखील अशी फेक आहे. भाजप आणि मिंधे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात जे टेनंट्स आहेत जेवढी जागा त्यांची आता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल. पण अधिक ठिकाणी पाहाल तर जागा मालकांचे राइट्स हे बिल्डरांनी घेतले आहेत. त्यांना वाढीव एफएसआय मिळणार, टीडीआर मिळणार, अजून कॉम्पेंसेटरी काही मिळणार, इन्सेन्टिव्ह मिळणार, बेनिफिट मिळणार म्हणजे नेमकं तुम्ही कोणाचे सरकार आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या जागा मालकांच्या लॉबीने तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग केलंय का किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का? हे भाजपचं सरकार हे बिल्डर जनता पार्टी आहे ते भारतीय जनता पार्टी नाहीये. खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या बिल्डरांसाठी केलेल्या आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. आज सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना विनंती करतोय की, हे जे काही पागडीमुक्त मुंबई बोलत आहेत मिंधे बोलत असतील भाजप बोलत असेल, फसवी घोषणा आहे बळी पडू नका. आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या. त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे. ही खरी परिस्थिती आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

follow us