संध्याकाळी फक्त 6 वाजेपर्यंतच परवानगी; मनोज जरांगेंना हायकोर्टाने फटकारलं, सुनावणीत नेमकं काय घडलं?

संध्याकाळी फक्त 6 वाजेपर्यंतच परवानगी; मनोज जरांगेंना हायकोर्टाने फटकारलं, सुनावणीत नेमकं काय घडलं?

Hearing On Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange Patil) उपोषणाला आता कायदेशीर वळण लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज झालेल्या सुनावणीत आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा सरकारच्या वकिलांनी उपस्थित केला.

अटींचे वारंवार उल्लंघन

सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू करण्यापूर्वी न्यायालयात हमीपत्र दिले होते. या हमीपत्रात सर्व अटी-शर्तींचे पालन करू असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते. परंतु प्रत्यक्षात त्या अटींचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी वाढवून दिली जाणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलंय. मराठा आंदोलनात नियम भंग झाल्याचा युक्तिवाद देखील त्यांनी केलाय.

सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका

सराफ यांनी पुढे सांगितले की, आंदोलनासाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्यात आले. शिवाय, ज्या जागेसाठी परवानगी देण्यात आली होती त्यापलीकडेही आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले आहेत. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या खटल्यात मराठा आंदोलक कैलास खंडबहाले यांनीदेखील हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सुनावणी अधिक संवेदनशील बनली आहे. उच्च न्यायालयात यावर आज दीर्घ चर्चा झाली. न्यायालयाने देखील हमीपत्रातील अटी मोडल्या गेल्या आहेत का, यावर कठोर शब्दांत सुनावणी केली.

मोठी बातमी, अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली, पोलिसांचा फौजफाटा तैनात

न्यायालयाची सुट्टी असतानाही सुनावणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आज (1 सप्टेंबर) चौथ्या दिवशीही सुरू आहे. 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांसह जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर हजारो वाहनं शहरात दाखल झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.दरम्यान, या आंदोलनावर आज एक मोठा कायदेशीर घडामोडी घडली आहे. एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, आज न्यायालयाची सुट्टी असतानाही ही सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडतेय. वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील न्यायालयात हजर झालेत. सदावर्ते यांनी याआधीही जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली होती.

एका दिवसापुरतीच परवानगी

मुळात या प्रकरणी सुनावणी 9 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र मुंबईतील परिस्थिती आणि वाहतुकीवर होत असलेला ताण पाहता कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच्या सुनावणीत सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी अडवण्यास मनाई केली होती. तसेच आझाद मैदानात फक्त 5 हजार जणांनाच आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांनी आंदोलनासाठी काही अटी घातल्या होत्या. एका वेळी एका दिवसापुरतीच परवानगी, ठराविक वाहनांची मर्यादा, ध्वनीक्षेपक वापरास बंदी, कचरा टाकण्यास मनाई अशा अटींचं पालन करण्याची सक्त सूचना होती. तसेच लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्ध व्यक्तींना आंदोलनात आणू नये, असंही स्पष्ट करण्यात आलं होतं.

तुमचा Gmail पासवर्ड लगेच बदला! स्वत: गुगलनेच दिला वापरकर्त्यांना इशारा, धक्कादायक कारण…

दरम्यान, आज मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे सीएसएमटी परिसरातील रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले असून, नरिमन पॉईंट, कुलाबा आणि मंत्रालय परिसराकडे जाणाऱ्या बसेसही थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, आजच्या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube