इंग्रजी बोलताना अडखळले अन् फसले! बनावट कागदपत्रांच्या आधारे युकेला जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बनावट कागदपत्रांच्या आधारे लंडनला (London) निघालेल्या आठ जणांना अटक केली आहे. मर्चंट नेव्हामध्ये भरती होण्यासाठी लंडनला निघाल्याचा दावा या आठ जणांनी केला होता. मात्र इंग्रजी बोलता न आल्याने तपास अधिकाऱ्यांचा संशय बळावला, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले. दिलवर सिंग, सुभम सोम नायपाल सिंग, मनदीप सिंग, कैशदीप सिंग, सुशील पाल, जसविंदर पॉल, कुशलप्रीत सिंग आणि कुलजीत सिंग अशी या आठ जणांची नावे आहेत. तर या टोळीचा मुख्य सूत्रधार अब्राहम कुरेशी याचा सहार पोलीस शोध घेत आहेत. (Eight people were arrested for leaving for London on the basis of fake documents from Mumbai International Airport)
याबाबत अधिक माहिती अशी की, या आठही जणांकडे मुंबई ते लंडन प्रवासाचे बोर्डिंग पास होते. मात्र विमानतळावर तैनात असलेले इमिग्रेशन अधिकारी गणेश माधव गवळी, रणजित कुमार आणि श्याम सुंदर सिंग यांना या आठ जणांची संशयास्पद वागणूक लक्षात आली. त्यानंतर ताब्यात घेऊन चौकशी केली असता युकेतील मर्चंट नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी निघाल्याचा दावा या सर्वांनी केला. मात्र इंग्रजीमध्ये संवाद साधण्यास सर्वांनाच अडचण येत होती. त्यावेळी इंग्रजी बोलता येत नसल्याने या आठ जणांवरील संशय आणखी बळावला.
Uddhav Thackeray : ‘2014 पासून देशाच्या पाठीमागे ‘पनौती’.. ठाकरे गटाची खोचक टोलेबाजी
त्यानंतर प्रभारी अधिकारी विक्रम कुमार आणि ड्युटी ऑफिसर राजन नागपाल यांच्यासमोर सर्व प्रकाराची चौकशी झाली. शिपिंग कंपनीकडे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, कागदपत्रे बनावट असल्याची पुष्टी झाली. यानंतर अधिकाऱ्यांनी सहार पोलिसांकडे तक्रार केली आणि या सर्वांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. या सर्वांकडून कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट (CDC), बनावट ई-प्रवासी पत्रे, बनावट जहाज जॉइनिंग लेटर, बोर्डिंग पास आणि पासपोर्टसह विविध बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. या आठ जणांकडे अधिक चौकशी केली असता, अब्राहम कुरेशी हा या टोळीचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. प्रति व्यक्ती 25 लाख रुपये घेऊन बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीयांना युकेला जाण्यास आणि तिथले नागरिकत्व मिळवून देण्यास हा व्यक्ती काम करत होता, अशी माहिती समोर आली.
अब्राहम कुरेशी हा सूत्रधार एजंटांमार्फत भारतीय नागरिकांना यूकेमध्ये स्थायिक होण्याचे आमिष दाखवून काम करतो. तो विशेषतः गुजरात, पंजाब आणि तामिळनाडूमधील लोकांना लक्ष्य करतो. एकदा यूकेमध्ये गेल्यावर कुरेशी सर्वांना त्यांचे मूळ पासपोर्ट जाळून टाकण्यास सांगतात आणि यूकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांची व्यवस्था करण्यात तो पुढे मदत करतो. त्यानंतर त्यांना पेट्रोल पंप किंवा स्टोअरमध्ये रोजगार मिळवून देतात. यात महिन्याला 2-3 लाख रुपये कमावता येतात. कुरेशीने यापूर्वी अनेकांना यशस्वीरित्या मुंबईतून लंडनला पाठविले असून त्यांना तिथले नागरिकत्व मिळवून दिले असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
Covid Scam : ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
15 दिवसांपूर्वीही अशाच एका व्यक्तीला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. सामान्यपणे मर्चंट नेव्हीचे जॉईंनिंग लेटर हे हार्ड कॉपीमध्ये असते. मात्र त्याने व्हॉट्सअॅपवरतीच जॉईनिंग लेटर आणि इतर कागदपत्र सादर केली होती. त्यावरुन त्याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेतले असता त्यालाही इंग्रजी बोलता येत नव्हते. त्यानंतर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता अशी कोणतीही कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा अशाच प्रकारे युकेला जाणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.