महायुतीला पाठिंबा का दिला? प्रचारसभा घेणार का? दोन कळीचे प्रश्न, राज ठाकरेंचीही ‘खास’ उत्तरं

महायुतीला पाठिंबा का दिला? प्रचारसभा घेणार का? दोन कळीचे प्रश्न, राज ठाकरेंचीही ‘खास’ उत्तरं

Raj Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली होती. लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार दिसणार नाही पण पक्षाचे कार्यकर्ते महायुतीसाठी काम करतील हे नेमकं काय राजकारण याचा खुलासा आज खुद्द राज ठाकरे यांनीच केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले. त्यात राम मंदिरही आहे. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते तर राम मंदिर उभे राहिलेच नसते असे राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची धोरणे पाहता आणखी पाच वर्षे त्यांनाच संधी मिळावी असे मला आणि पक्षाला वाटलं.

Raj Thackeray : भाजपाला पाठिंबा देताच मनसेला गळती, राज यांना पत्र लिहीत सरचिटणीसाचा राजीनामा

महायुतीला पाठिंबा दिला आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, यावर मी अजून काहीच विचार केलेला नाही. पुढे पाहू काय करायचं. गुढीपाडवा मेळाव्यात मी सांगितलं होतं की मनसेचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा राहिल. पहिल्या पाच वर्षांत आम्हाला त्यांच्या भूमिका पटल्या नाहीत तेव्हा टीका केली होती. ज्यावेळी टीका केली तेव्हा काय मागितलं नव्हतं. टीका केली ती मुद्द्यांवर केली होती. नंतरच्या पाच वर्षांत काही बदल झाले त्यामुळे स्वागतही केले. राम मंदिर, 370 कलम असे अनेक निर्णय मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले.

मागील 1992 पासून राम मंदिर रखडलं होतं. जरी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला होती तरी जर मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं. हा विषय तसाच राहून गेला असता. यांसह अनेक गोष्टींसाठी मी त्यांचं स्वतः फोन करून अभिनंदन केलं होतं. म्हणून पुन्हा त्यांना संधी देणं मला आवश्यक वाटलं आणि गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणं जिवंतपणाचं लक्षण; प्रकाश महाजन स्पष्टच बोलले

अर्थात राज्यासाठी आमच्या काही मागण्या आहे त्याची यादी आम्ही त्यांना देणारच आहोत. मोदी गुजरातचे आहेत त्यामुळे गुजरातवर प्रेम असणं सहाजिक आहे. पण, मोदींनी सर्व राज्यांकडे समान दृष्टीने पहावे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.  आज मी त्यांना पाठींबा दिला त्यावर पक्ष पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. महायुतीतील अन्य नेत्यांनी आमच्या पक्षातील कोणत्या नेत्यांशी संपर्क करायचा यादी दोन दिवसांत त्यांना देऊ. महायुतीत आम्हाला योग्य मान देतील ही माझी अपेक्षा आहे. प्रचार आणि सहकार्याच्या सूचना मी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube