“कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या”, आव्हाडांनी नार्वेकरांना थेट निकालपत्रच धाडले

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना (Rahul Narvekar) पत्र लिहून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. पत्रासोबत आपण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत देखील पाठवत असल्याचा उल्लेख सदर पत्रात केला आहे. माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, की राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राची प्रत तसेच कृषिमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी करणाऱ्या पत्रासोबत देत आहोत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकालाची प्रत उशिरा मिळत असल्याने आपण त्यांना सदर प्रत देत आहोत. ते स्वतः वकील असल्याने योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. दिवगंत माजी मंत्री तुकाराम दिघोळेंबाबत त्यांनी ज्या भाषेचा वापर केला त्याबाबत कोकाटे यांनी दिघोळे कुटुंबाची माफी मागावी अशी मागणी आमदार आव्हाड यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी, सुनील केदार यांना तुम्ही घरी पाठवले. महाविकास आघाडीवर अनेक कारवाई आपण केल्यात आता महायुतीवर वेळ आली तर मला निकालपत्रच मिळाले नाही असे म्हणता अशी टीका आव्हाड यांनी केली.
अगोदर गोट्या खेळत होता का? अभिजीत पवार यांचा पक्षप्रवेश अन् जितेंद्र आव्हाडांना अजितदादांचा टोला
पत्रात नेमकं काय?
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने निकालपत्रात नमूद केलेल्या बाबी अत्यंत गंभीर आहेत. न्यायालयाचा निकाल आणि अस्तित्वात असलेल्या भारतीय कायद्यांचा विचार करता माणिकराव कोकाटे यांचे विधानसभा सदस्यत्व निष्काषित करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती असे या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली असल्याने त्यांच्या आमदारकीसह मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. कोकाटे यांच्या आमदारकीविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांनंतर मी ‘यांना’ आपला नेता मानतो; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत