आता टू-व्हिलरवरून घसरून पडणं विसरा; दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; नेमकं काय होणार?

आता टू-व्हिलरवरून घसरून पडणं विसरा; दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; नेमकं काय होणार?

ABS Mandatory for Two Wheeler Bikes : देशभरात रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघातांना (Road Accident) आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 पासून निर्मित सर्व दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेक (ABS) बंधनकारक राहणार आहे. रिपोर्ट्सनुसार नवीन नियम (Road Safty) पुढील वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्व नवीन स्कूटर आणि दुचाकींसाठी लागू राहणार आहेत. आजमितीस फक्त 125 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या दुचाकींना सिंगल चॅनल ABS बंधनकारक आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चरर्स (SIAM) द्वारा प्रकाशित आकडेवारीनुसार 2025 या आर्थिक वर्षात भारतात एकूण 1.96 कोटी दुचाकींची विक्री झाली. यातील 1.53 कोटींपेक्षा जास्त दुचाकींची इंजिन क्षमता 125 सीसीपेक्षा कमी किंवा त्या बरोबरीने आहे.

अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अचानक किंवा वेगात ब्रेक दाबल्यानंतर चाक लॉक होण्यापासून वाचवते. यामुळे गाडी घसरणे किंवा क्रॅश होण्याचे प्रमाण कमी होते. अभ्यासानुसार ही सुरक्षा सुविधा दुर्घटना होण्याची शक्यता 35 ते 45 टक्क्यांनी कमी करू शकते. सध्याच्या नियमांनुसार 125 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी सिंगल चॅनल एबीएस किंवा पुढील चाकावर एबीएस बसवणे बंधनकारक आहे.

राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त, विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घोषणा केली आहे की या प्रकारची सुरक्षा व्यवस्था रस्ते अपघात आणि अपघातात होणारे मृत्यू कमी करण्याच्या रणनितीचा भाग आहे. वाहनांची विक्री करताना त्यासोबतच दोन बीआयएस प्रमाणित हेलमेट ग्राहकांना उपलब्ध करून देणेही बंधनकारक केले जाणार आहे. या दोन्ही नियमांसाठी लवकरच अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या एकूण मृत्यूत 44 टक्के दुचाकी वाहनचालक असतात. हेलमेट न घातल्याने डोक्याला जबर मार लागून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. आता सर्व वाहनांत एबीएस लागू होणार असल्याने वाहनांच्या किंमती थोड्या वाढणार आहेत. एंट्री लेव्हल दुचाकी वाहनांच्या किंमतीत एबीएसमुळे अडीच हजार ते साडेतीन हजार रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या सिंगल चॅनल एबीएस दुचाकी वाहनांत पुढील बाजूला डिस्क ब्रेक असतात.

पुणे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाचा मोठा निर्णय; पावणे पाचशे वाहने काढली भंगारात

एबीएस काय आहे?

* अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम एक सेफ्टी फीचर
* जे वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरले जाते
* ABS बाईक किंवा कोणत्याही वाहनाला ब्रेक लावताना टायर लॉक होण्यापासून रोखते.

घसरण्याचा धोका होतो कमी

* अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते
* त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही.
* हे टाळण्यासाठी आणि वाहन घसरून अपघात होऊ नये यासाठी फायदेशीर
* एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात
* तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते
* त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळते

ABS कसे काम करते?

* ABS मध्ये काही विशिष्ट सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स असतात
* जे टायर्सच्या वेगाचे सतत निरीक्षण करते
* ब्रेक लावताच, सेन्सर्स टायरच्या वेगाचे निरीक्षण करते
* जर, टायर अचानक लॉक होऊ लागला तर, ABS काही काळासाठी त्या टायरवरील ब्रेक प्रेशर कमी करते
* बाईक संतुलित होताच, ही प्रणाली लगेच पुन्हा ब्रेक लावते

ABS चे किती प्रकार आहेत?

* सिंगल चॅनेल एबीएस: फक्त पुढच्या चाकावर काम करते
* ड्युअल चॅनेल एबीएस : पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर काम करते
* आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते

follow us
  • fb
  • instagram
  • youtube